पहिल्या पर्वणीच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तू मुबलक

By Admin | Updated: September 13, 2015 23:31 IST2015-09-13T23:31:19+5:302015-09-13T23:31:48+5:30

दर सामान्य असल्याने नागरिक समाधानी

Compared to the first festival, the necessities of life are abundant | पहिल्या पर्वणीच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तू मुबलक

पहिल्या पर्वणीच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तू मुबलक

नाशिक : पहिल्या पर्वणीला प्रशासनातर्फे बंदोबस्ताचे नियोजन व्यवस्थित न केल्याने भाविकांप्रमाणेच स्थानिक रहिवासी आणि प्रसारमाध्यमांनी प्रशासनाचे कान टोचले होते. पहिल्या पर्वणीला घातलेल्या निर्बंधामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याचे आणि काही वस्तूंचा तुटवडा झाल्याचे चित्र शहरात आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस पहायला मिळाले होते.
सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनातर्फे दुसऱ्या पर्वणीसाठी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा शहर परिसरात फारसा जाणवला नसल्याचे चित्र रविवारी शहरात बघायला मिळाले. शनिवार (दि.१२) साधुग्राममध्ये अवाच्या सवा भावात दुधाची विक्री झाल्याने नागरिकांनी आश्चर्याने भुवया उंचावल्या होत्या; परंतु रविवार (दि.१३) पर्वणीच्या दिवशी ‘लोकमत चमू’ने शहरात फेरफटका मारला असता जीवनावश्यक वस्तूंचे दर सामान्य तसेच या वस्तूंचा मुबलक पुरवठा असल्याचे आढळून आले.
पहिल्या पर्वणीत वाहतूक निर्बंधांमुळे गुजरात, अहमदनगर, पेठ यांसारख्या इतर ठिकाणांहून नाशिकमध्ये दूध दाखल झाले नव्हते. तसेच आगाऊ साठा करून ठेवल्याने दूध नासण्याचेही प्रकार घडले होते. परंतु दुसऱ्या पर्वणीत प्रशासनाकडून शिथिलता मिळाल्याने सामान्य नागरिकांप्रमाणेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.
दूध, भाजी, स्वयंपाकाचा गॅस, औषधे पहिल्या पर्वणीच्या तुलनेत रविवारी नेहमीच्या किमतीत तसेच मुबलक साठा असल्याने अगदी सहजतेने मिळत असल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी)

Web Title: Compared to the first festival, the necessities of life are abundant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.