येवला : अमावास्येच्या दिवशी शेतमाल विक्री सुरू केलेल्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि सचिवांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या येथील शाखेच्या वतीने बाजार समितीत सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे अभिनंदन करणारे पत्रही देण्यात आले.
भारत हा कृषी प्रधान देश आहे, मात्र आज या देशातील शेतकरी अनेक कारणांमुळे मेटाकुटीस येऊन तो अत्यंत नाईलाजास्तव आत्महत्येचा मार्ग अवलंबित आहे. या बळीराजाच्या आयुष्यात अनेक अनिष्ट रुढी-परंपरामुळेदेखील संकटे येत असतात. अर्थातच त्यामुळे त्याचे जगणे परावलंबी आणि कष्टमय झाले आहे. म्हणजे त्याचे जगणे नैसर्गिक आपत्तींबरोबरच मानवनिर्मित संकटामुळे देखील अवघड झालेले असतानाच त्याने मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेत मालाला विक्री करण्यासाठी अमावास्येचा अडथळा होता. सभापती वसंतराव पवार आणि सचिव कैलास व्यापारे यांनी व्यापारी बंधू सोबत चर्चा करून अमावास्येच्या दिवशी शेतमाल विक्री सुरू ठेवण्याचा घेतलेला निर्णय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून घेतलेला आहेच, परंतु या निर्णयामुळे शेतकरी बांधवांमध्ये अमावास्येबाबत हजारो वर्षांपासून रुजलेली अंधश्रद्धा आणि भीती दूर सारण्याचे फार मोठे काम बाजार समितीने केली आहे. अर्थात त्यामुळे येवला बाजार समिती अभिनंदनास तथा गौरवास पात्र ठरली असल्याचे सदर पत्रात म्हटले आहे. सभापती पवार आणि सचिव व्यापारे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अर्जुन कोकाटे, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, दिनकर दाणे, प्रा. डाॅ. अजय विभांडिक, ॲड. दिलीप कुलकर्णी, पंडित मढवाई, बाबासाहेब कोकाटे, रामनाथ पाटील, कानिफनाथ मढवाई, आप्पासाहेब शिंदे, हेमंत पाटील, शैलेश अहिरे आदींनी सत्कार केला. (२० येवला ५)
200921\20nsk_29_20092021_13.jpg
२० येवला ५