त्या रुग्णालयांच्या कारभाराच्या चौकशीसाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:58 IST2018-10-06T00:58:27+5:302018-10-06T00:58:37+5:30
रक्त तपासणी अहवालात डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे रुग्णांना खोटे सांगून रुग्णांची फसवणूक केल्याच्या आरोपानंतर महापालिकेच्या वतीने डॉ. जयराम कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून एकूण तीन रुग्णालयांना भेटी देऊन ही समिती अहवाल तपासणी करणार आहे. शिवाय, आरोप असलेल्या लॅबचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे.

त्या रुग्णालयांच्या कारभाराच्या चौकशीसाठी समिती
नाशिक : रक्त तपासणी अहवालात डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे रुग्णांना खोटे सांगून रुग्णांची फसवणूक केल्याच्या आरोपानंतर महापालिकेच्या वतीने डॉ. जयराम कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून एकूण तीन रुग्णालयांना भेटी देऊन ही समिती अहवाल तपासणी करणार आहे. शिवाय, आरोप असलेल्या लॅबचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे.
सध्या नाशिकमध्ये डेंग्यू आणि स्वाइन फ्लूचे थैमान सुरू असून, त्यात काही रुग्णालयात डेंग्यू आणि स्वाइन फ्लू झाल्याचे सांगून उपचार करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. पंचवटीतील दिंडोरीरोडवरील एक रुग्णालयात थंडी तापाने दाखल एक रुग्णाच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. सदर रुग्णाची रक्त तपासणी केली असता त्याला डेंग्यू झाल्याचा दावा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केल्याने भयभीत झालेल्या रुग्णांनी अन्य दुसºया एका लॅबमध्ये रक्त तपासणी केली होती त्यात डेंग्यू नसल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित रुग्णाने मनपाकडे तक्र ार केली होती. या प्रकारानंतर डॉ. जयराम कोठारी यांनी सदर रुग्णालयास भेट दिली होती. अशाच प्रकारे आणखी दोन रुग्णालयांविषयीदेखील तक्रारी आहेत. यासंदर्भात महापालिकेचे प्रभारी आरोग्यवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी डॉ. जयराम कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली असून, ही समिती तिन्ही रुग्णालयांची तपासणी करणार आहेत. त्याचप्रमाणे दोन लॅबचीदेखील तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक तक्रारी
रुग्णालयांच्या बाबतीत महापालिकेकडे एकच लेखी तक्रार आली असली तरी तोंडी अनेक रुग्णालयाबाबत तक्रारी आल्या आहेत. लेखी तक्रारी आलेल्या रुग्णालयांबाबत चौकशी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याचे वृत्त आहे.