नाशकात बनावट नोटांसह कमिशनच्या गोरखधंद्यात तेजी!
By Admin | Updated: December 24, 2016 01:16 IST2016-12-24T01:15:52+5:302016-12-24T01:16:58+5:30
आयकर विभागाची कारवाई : चालू महिन्यातच जप्तीच्या तीन घटना

नाशकात बनावट नोटांसह कमिशनच्या गोरखधंद्यात तेजी!
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनबंदीची घोषणा केल्यानंतर देशभरातील अनेक ठिकाणी पोलीस व आयकर विभागाने छापे टाकून जुन्या व नवीन चलनी नोटा जप्त केल्या़ नाशकात डिसेंबर महिन्यातच नोटा जप्तीच्या तीन घटना घडल्या आहेत़ या सर्व घटनांमधील कडी करणारी गुरुवारची घटना आहे़ या घटनेमुळे नाशकात केवळ कमिशनद्वारे नोटांची अदलाबदल केली जात असून, नोटांची छपाईदेखील केली जात असल्याचे पोलिसांनी संशयितांवर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे समोर आले आहे़
चलनबंदीनंतर सरकार दररोज वेगळ्या नियमांची घोषणा करीत होते, तर सर्वसामान्य नागरिक पैसे मिळावेत यासाठी बँकांचे उंबरठे झिजवित होते़ या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन कमिशनवर काळ्याचे पांढरे करणाऱ्यांचा धंदा चांगलाच तेजीत आला़ कमिशनवर जुन्या नोटा स्वीकारून नवीन नोटा दिल्या जात असल्याचे सरकारवाडा व इंदिरानगर पोलिसांनी चौघा संशयितांकडून ३० लाख रुपये जप्त केल्यानंतर समोर आले़
पोलिसांनी गुरुवारी (दि़ २२) मध्यरात्री हॉटेल जत्रासमोर तीन वाहनांतून अकरा संशयितांना अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे़ या संशयितांकडे जुन्या चलनातील खऱ्या नोटा कमी व बनावट नोटांचा भरणाच अधिक होता़ विशेष म्हणजे या नोटा नाशकात छापण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे़ पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांवर दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये भारतीय दंडविधान कलम ४८९-ड चा समावेश आहे़ या कलमाचा अर्थ बनावट व चलनी नोटा तयार करण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री जवळ बाळगणे अथवा तयार करणे असा आहे़
त्यामुळे पोलिसांनी अटक केलेले संशयित हे केवळ कमिशनवर नोटा बदलून देत नव्हते तर बनावट नोटांची छपाईही करीत होते असा अर्थ होतो़ या संशयितांकडून नोटा छापण्याची सामग्रीही पोलिसांनी जप्त केल्याची चर्चा असून, यामधील आरोपींची संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ तसेच या संशयितांबरोबर आंतरराज्य वा आंतरराष्ट्रीय टोळीच्या सहभागाची शक्यता नाकारता येणार नाही़ नाशिकमध्ये मोठ्या संख्येने सुरू असलेल्या बनावट व कमिशन नोटांवरील गोरखधंद्यास चाप लावण्याचे आयकर व पोलीस यांचे प्रयत्न सुरू आहेत़ (प्रतिनिधी)