आयुक्त पेन्शनधारकांच्या दारी
By Admin | Updated: January 17, 2015 00:07 IST2015-01-17T00:07:39+5:302015-01-17T00:07:51+5:30
आयुक्त पेन्शनधारकांच्या दारी

आयुक्त पेन्शनधारकांच्या दारी
सातपूर : निवृत्तिवेतनधारक आपल्या हयातीचा दाखला वेळत सादर करीत नसल्याने त्यांची पेन्शन बंद होण्याचा धोका असतो. यास्तव पेन्शनधारकांना वारंवार दाखला सादर करण्याचे आवाहन केले जाते. तरीही दाखला सादर करण्यास दिरंगाई होत असल्याने अखेर भविष्य निर्वाह निधी आयुक्त थेट पेन्शनधारकांच्या निवास्थानी पोहचून दाखले सादर करण्याचे आवाहन करीत आहेत.
नाशिक विभागात सुमारे लाखाच्या जवळपास पेन्शनधारक आहेत. नियमित पेन्शन मिळण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात पेन्शनधारकांना आपापल्या बॅँकेत हयातीचा दाखला सादर करावा लागतो. हयातीचा दाखला सादर केला नाही, तर मासिक पेन्शन बंद होऊ शकते, परंतु याबाबतची दिलेली मुदतवाढ संपूनही अनेक पेन्शनधारक हयातीचा दाखला सादर करीत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी अखेर अशा पेन्शनधारकांचे घर गाठले.
हयातीचा दाखला सादर करावा यासाठी तीन वेळेला मुदतवाढ देऊनही, असे पेन्शनधारक हयातीचा दाखला सादर करीत नसल्याने आयुक्तांनी थेट त्यांचे घरच गाठले. तांबे यांच्या सोबतीला सहायक आयुक्त हेमंत राऊत, रवींद्र मराठे हेही होते. आयुक्तांनी कामटवाडे, सिडको शिवारात राहणाऱ्या पेन्शनधारकांची भेट घेतली. त्यांना मार्गदर्शन करताना पेन्शनचे महत्त्वही पटवून सांगितले. एकदा बंद झालेली पेन्शन पुन्हा सुरू करण्याबाबतच्या अडचणी त्यांनी संबंधितांना समजावून सांगितल्या.