भगूर मुख्याधिकाऱ्यांना आयोगाची नोटीस
By Admin | Updated: January 29, 2017 00:10 IST2017-01-29T00:09:52+5:302017-01-29T00:10:06+5:30
मतांचा टक्का घटला : मागविला लेखी खुलासा

भगूर मुख्याधिकाऱ्यांना आयोगाची नोटीस
नाशिक : गेल्या महिन्यात झालेल्या राज्यातील २१० नगरपालिकांच्या निवडणुकीत मतदारांनी केलेल्या मतदानाचा राज्य निवडणूक आयोगाने अभ्यास सुरू केला असून, कमी मतदान झालेल्या नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना त्याबाबत जाब विचारला जात आहे. नाशिक जिल्ह्यात भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना याच कारणावरून आयोगाने नोटीस पाठवून लेखी खुलासा मागविला आहे. राज्य आयोगाने थेट मुख्याधिकाऱ्यांना अशा प्रकारे जाब विचारण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे. गेल्या महिन्यात राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आला होता. त्यात प्रामुख्याने नव मतदारांची नोंदणी, नाव, पत्त्यात बदल तसेच मतदान केंद्राचे स्थलांतर या गोष्टीसाठी आयोगाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेतली होती.