व्यावसायिकांची हुकली पर्वणी
By Admin | Updated: August 29, 2015 23:13 IST2015-08-29T23:12:44+5:302015-08-29T23:13:23+5:30
उलाढाल ठप्प : अतिरेकी नियोजनाचा फटका

व्यावसायिकांची हुकली पर्वणी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीकाळात शहरात सुमारे दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचे सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाले खरे; परंतु पोलिसांच्या अतिरेकी नियोजनामुळे व्यावसायिकांना पर्वणीच्या दिवशी आपले व्यवहार बंद ठेवावे लागल्याने लाखो रुपयांच्या उलाढालीवर पाणी सोडावे लागले. नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वरलाही याहून वेगळी परिस्थिती नव्हती.
सिंहस्थ कुंभमेळ्यात शहरातील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊन सुमारे दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचे सांगितले जात होते. तीर्थक्षेत्री पर्वणीला सुमारे १ कोटी भाविक येण्याचा अंदाजही पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने वर्तविला होता. त्यानुसार, मोठ्या कमाईची व्यावसायिक संधी चालून आल्याने शहरातील व्यावसायिकांनी मालाचा साठा करून ठेवला आहे. प्रामुख्याने, छोट्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना या पर्वणीकाळात चांगल्या कमाईची संधी होती. काही व्यावसायिकांनी सिंहस्थ सेलच्या माध्यमातूनही कमाईचे स्वप्न पाहिले होते, परंतु पोलिसांनी या साऱ्या स्वप्नांवर वरवंटा फिरविल्याने व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तीर्थक्षेत्री येणारे भाविक हे शहरातून काही ना काहीतरी वस्तू खरेदी करतच असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. मात्र, पर्वणीला येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या गर्दीचा बाऊ करत पोलीस प्रशासनाने अवास्तव नियोजन केले आणि ठिकठिकाणी रस्त्यांवर बॅरिकेडिंगच्या माध्यमातून नाकाबंदी केल्याने व्यावसायिकांना आपले व्यवहार नाइलाजाने बंद ठेवावे लागले. शुक्रवारी व शनिवारी असे दोन्ही दिवस व्यावसायिकांवर व्यवहार बंद ठेवण्याची वेळ आली. शनिवारी तर पर्वणीला शहरातील सारीच दुकाने बंद होती.
व्यवसायाची चालून आलेली आयती संधी पोलीस प्रशासनाने हिरावून घेतल्याने विशेषत: छोट्या भांडवलावर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये संतापाचा सूर आहे. (प्रतिनिधी)