शेतकरी संपाला ‘समृद्धी’ची जोड
By Admin | Updated: June 1, 2017 01:25 IST2017-06-01T01:25:48+5:302017-06-01T01:25:58+5:30
राज्यातील दहा जिल्ह्णांमधून जाणाऱ्या व हजारो शेतकऱ्यांना बाधित करणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या विरोधाची जोड देण्यात आली

शेतकरी संपाला ‘समृद्धी’ची जोड
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गुरुवारपासून सुरू होणाऱ्या शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाची व्याप्ती वाढविण्यासाठी राज्यातील दहा जिल्ह्णांमधून जाणाऱ्या व हजारो शेतकऱ्यांना बाधित करणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या विरोधाची जोड देण्यात आली असून, शेतकरी कर्जमुक्ती व बिनव्याजी कर्जपुरवठ्याच्या मागणीबरोबरच समृद्धी महामार्ग रद्द करण्यावरही शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
शेतमालाचे घसरलेले भाव, कर्जबाजारीपणा, नापिकी यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असून, त्यात दिवसागणिक वाढ होत चालली आहे. शासन दरबारी वेळोवेळी शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा व आंदोलने करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मागणी करण्यात आली, त्यासाठी विरोधी पक्षांनी राज्यव्यापी संघर्ष यात्रा काढूनही काहीच उपायोग होत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला असून, चालू खरीप हंगामात कोणतेही पीक न घेण्याचे ठरविण्यात आले व त्याची सुरुवात १ जून म्हणजेच मान्सूनच्या तोंडावर करण्यात येत आहे.
राज्यातील दहा जिल्ह्णांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे हजारो शेतकरी बाधित होणार असून, त्यांनी या मार्गाला उघड उघड विरोध दर्शविला आहे. अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांनाही संपात सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळेच की काय संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये समृद्धी महामार्ग रद्द करा ही मागणीही समाविष्ट करण्यात आली आहे. या संपात सक्रिय असलेल्या किसान सभेने शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ‘समृद्धी कुणाची, शेतकऱ्यांची की सरकारची?’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्याचे निश्चित केले आहे. शेतकरी संपाला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांना या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आल्याने समृद्धीचे पाठबळही वाढणार आहे.