जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST2021-09-18T04:16:36+5:302021-09-18T04:16:36+5:30
येवला येथील महिला तलाठ्याची वादग्रस्त बदली आणि प्रांताधिकाऱ्याने केलेले असभ्य वर्तन यामुळे राज्यात हे प्रकरण गाजले असून, याप्रकरणी आता ...

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना बजावली नोटीस
येवला येथील महिला तलाठ्याची वादग्रस्त बदली आणि प्रांताधिकाऱ्याने केलेले असभ्य वर्तन यामुळे राज्यात हे प्रकरण गाजले असून, याप्रकरणी आता विशाखा समितीने कारवाईची शिफारस केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी तातडीने प्रांताधिकारी सोपान कासारा यांना नोटीस बजावली. त्यामुळे त्यांच्यावर पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वादग्रस्त बदली आणि प्रांताधिकाऱ्याचे आक्षेपार्ह वर्तन यामुळे संबंधित महिला तलाठ्याने आपणाला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या मागणीची दखल न घेतल्याने त्यांना मॅट न्यायालयात धाव घ्यावी लागली होती, तर संबंधित प्रांताधिकारी सोपान कासार यांच्यावर पोलीस ठाण्यात विनयभंग, तसेच दमदाटी करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट महिला तलाठ्याशी संपर्क साधून या प्रकरणाविषयी विचारपूस केल्याने या प्रकरणाचे पुढे काय होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मॅटने तलाठी महिलेच्या बदलीस दिलेली स्थगिती आणि आता विशाखा समितीने प्रांताधिकाऱ्यावर कारवाई करण्याची शिफारस केल्याने या संपूर्ण प्रकरणात महिलेवर अन्याय झाल्याची बाब उघड झाली आहे.
बदलीस पात्र नसतानाही कासार यांनी ज्येष्ठतेचे नियम डावलून येवला येथील महिला तलाठ्याची नांदगाव तालुक्यात बदली केली होती. ही बदली रद्द करण्याच्या बहाण्याने प्रांताधिकारी कासार यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप पीडित तलाठी महिलेने केला होता. याबाबतची तक्रार विशाखा समितीकडे करण्यात आली होती, तर अन्यायकारक बदलीसाठी त्यांनी मॅटमध्येदेखील धाव घेतली होती. मॅटने त्यांंच्या बदलीला आगोदर स्थगिती दिली आणि त्यानंतर बदली रद्द करण्याचा निर्णय दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला होता, तर आता विशाखा समितीनेदेखील महिला तलाठ्यावर अन्याय झाल्याचे, तसेच त्यांना मानसिक त्रास झाल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे.
विशाखा समितीने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्यावर कारवाईची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कासारा यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.