शहरात वाढला थंडीचा कडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:59+5:302021-02-05T05:38:59+5:30
आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढू लागल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. गेल्या गुरुवारीदेखील किमान तापमान ११.४ अंश इतके ...

शहरात वाढला थंडीचा कडाका
आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढू लागल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. गेल्या गुरुवारीदेखील किमान तापमान ११.४ अंश इतके होते. सोमवारी मात्र अचानकपणे पारा १०.४अंशापर्यंत खाली घसरला होता. आठवडाभर किमान तापमान १४ अंशाच्यापुढे सरकलेले नाही. यामुळे हा आठवडा थंडीच्या तीव्रतेची जाणीव करून देणारा ठरला. पहाटे तसेच रात्रीच्या सुमारास वातावरणात गारठा अधिक जाणवत आहे. निरभ्र आकाशामुळे दिवसभर लख्ख प्रखर असा सूर्यप्रकाश राहत असल्याने कमाल तापमानाचा पारादेखील संध्याकाळपर्यंत ३० किंवा ३१ अंशांपर्यंत वर सरकत आहे. एकूणच नाशिककरांना दिवसभर हवेत गारवा जाणवत नसला तरीदेखील सूर्यास्त होताच नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येण्यास सुरुवात होते. रात्री थंडीची तीव्रता अधिक वाढते तसेच पहाटेसुध्दा सूर्योदयापर्यंत वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झालेला असल्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरत आहे. कोरोनाच्या सावटामुळे गेल्या वर्षी शाळांची घंटा वाजलीच नव्हती. प्राथमिक, माध्यमिक शाळा आता पुन्हा सुरू झाल्याने सकाळी थंडीच्या कडाक्यात शाळांमध्ये जाणाऱ्या चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांची लगबग पहावयास मिळत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी चिमुकले उबदार कपड्यांचा वापर करत पुन्हा ‘धडे’ गिरविण्यासाठी शाळांचा उंबरा ओलांडत आहेत.
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढला असून दिल्लीमध्ये थंडीचा प्रकोप वाढल्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्राच्याही वातावरणावर होताना दिसत आहे. पुढील काही दिवस नाशिक शहर व परिसरात थंडीची तीव्रता अशीच कायम राहणार असून किमान तापमानात अधिक घसरण होण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविली जात आहे.