Cloudy conditions add hail to destruction | ढगाळ वातावरणामुळे नाशकात गारठा वाढला
ढगाळ वातावरणामुळे नाशकात गारठा वाढला

ठळक मुद्दे गारवा निर्माण झाल्याने नाशिककरांना ‘कुलसिटी’चा अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहर व परिसरात शनिवारपासून अचानक ढगाळ हवामानासह पावसाला सुरुवात झाली. रविवारी दुसऱ्या दिवशीही नाशिककरांना सूर्यदर्शन घडू शकले नाही. दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. दिवसभरात १.९ मि.मी. इतका पाऊस रविवारी झाल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली.
मागील दोन दिवसांपासून शहराचे वातावरण अचानकपणे बदलले असून, ढगाळ हवामानासह पावसाला सुरुवात झाली आहे. रिमझिम पावसाचा वर्षाव शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही सुरूच होता. शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचे प्रमाण कमी राहिले असले तरी वातावरणात गारवा आणि अधूनमधून हलक्या सरींची रिपरिप कायम होती. या वीस दिवसांमध्ये शहरात ९५ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला आहे.
मागील आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने अचानक मतदानाच्या तोंडावर शहरात पुनरागमन केले. शनिवारी सायंकाळपर्यंत ६.६ मिमीपर्यंत पाऊस झाला. मागील दोन आठवड्यांपासून शहरात पावसाने विश्रांती घेतली होती. ‘कुलसिटी’चा अनुभव हवामान खात्याकडून जिल्ह्यातील डोंगराळ भागात शनिवारी व रविवारी (दि.२०) जोरदार पावसाचा इशारा दिला होता; मात्र शनिवारी सकाळपासूनच ढग दाटून आल्याने पावसाचे वातावरण तयार झाले होते. दुपारी १ वाजेपासून शहराच्या सीबीएस, गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, मुंबई नाका, जुने नाशिक, द्वारका, पंचवटी, सातपूर या भागात पावसाच्या सरींचा वर्षाव सुरू झाला. रिमझिम सरींमुळे रस्ते चिंब भिजले. तसेच वातावरणातही गारवा निर्माण झाल्याने नाशिककरांना ‘कुलसिटी’चा अनुभव रविवारीही आला.


Web Title: Cloudy conditions add hail to destruction
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.