महामार्गाची डागडुजी होईपर्यंत एक महिना टोल बंद करा; अन्यथा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:12+5:302021-09-19T04:16:12+5:30

नाशिक : इगतपुरीपर्यंत महामार्गाची अनेक ठिकाणी चाळण झाली असल्याने रस्ते अपघातामुळे जाणाऱ्या बळींची जबाबदारी कुणाची? असा सवाल करीत खासदार ...

Close the toll for a month until the highway is repaired; Otherwise ...! | महामार्गाची डागडुजी होईपर्यंत एक महिना टोल बंद करा; अन्यथा...!

महामार्गाची डागडुजी होईपर्यंत एक महिना टोल बंद करा; अन्यथा...!

नाशिक : इगतपुरीपर्यंत महामार्गाची अनेक ठिकाणी चाळण झाली असल्याने रस्ते अपघातामुळे जाणाऱ्या बळींची जबाबदारी कुणाची? असा सवाल करीत खासदार हेमंत गोडसे यांनी रस्त्याची जबाबदारी असलेल्या टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच जोपर्यंत महामार्गाची डागडुजी पूर्ण होऊन नियमांनुसार सर्व सुविधा दिल्या जात नाहीत, तोपर्यंत किमान एक महिना कंपनीने स्वत:हून टोल घेणे बंद करावे; अन्यथा वरिष्ठ स्तरावर रस्त्याची वस्तुस्थिती मांडून टोल बंद करायला भाग पाडू, असा इशारा खासदार हेमंत गोडसे यांनी घोटी टोलनाका प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिला.

खासदार हेमंत गोडसे यांनी शनिवारी महामार्गावरून नाशिक ते कसारा रस्त्याची पाहणी करीत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (न्हाई) तसेच टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कडक शब्दांत जाब विचारला. घोटी, वासाळी फाटा, पिंपरी सदो फाटा ते इगतपुरीदरम्यान रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. येत्या ३० तारखेच्या आत संपूर्ण महामार्ग शंभर टक्के सुविधांसह प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज न झाल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारादेखील त्यांनी दिला. शासनाशी झालेल्या करारात स्पष्ट केलेल्या बाबी आणि सुविधा देत नसताना टोलवसुली करणे नैतिकदृष्ट्या अयोग्य असून, त्याबाबत नैतिक जबाबदारी म्हणून महामार्गाचे काम होत नाही, तोपर्यंत किमान महिनाभर टोलवसुली थांबवावी, असेही खासदार गोडसे यांनी नमूद केले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी राष्ट्रीय महामार्गाचे बी. एम. साळुंके, व्यवस्थापक दिलीप पाटील, आर्टिफॅक्टचे महेंद्र सूर्यवंशी, टोल प्रशासनाचे गिरीश कामत, आदींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घोटी, इगतपुरी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इन्फो

रस्त्याच्या दुर्दशेपायी हकनाक बळी

पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच महामार्गाची चाळण झाली असून, या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गाला असणाऱ्या साईडपट्ट्या आणि कॅटआय नसल्याने गत काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आजपर्यंत प्रवाशांचे हकनाक बळी गेले आहेत. कित्येक प्रवाशांना अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. अपघातातील बळींबाबत ‘लोकमत’च्या बातमीची ई-कॉपी दाखवत अजून किती प्रवाशांचे बळी जाण्याची वाट बघणार आहात, अशा शब्दांत खासदार गोडसे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. ९९ किलोमीटरचा रस्ता महिनाअखेरपर्यंत दुरुस्त झालाच पाहिजे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा गर्भित इशारावजा सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी महामार्ग पाहणी दौऱ्याप्रसंगी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

इन्फो

या गंभीर स्थितीला जबाबदार कोण?

यावेळी अत्यंत दुरवस्था झालेल्या गोंदे फाटा, मुढेगाव फाटा, भंडारदरा फाटा, घोटी, भावली फाटा, घोटी वाहतूक टॅप, इगतपुरी, कसारा घाट या ठिकाणी घेऊन जात महामार्गाची पाहणी केली. महामार्गालगत दोनही बाजूंना पाच फूट डांबर आणि पाच फूट मुरूम अशी साईडपट्टी असायलाच हवी. मग ९९ किलोमीटरच्या दरम्यान साईडपट्टी कोठेच का नाही, असा सवाल करीत गोडसे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल देखरेखीची जबाबदारी असलेल्या आर्टिफॅक्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि टोल प्रशासनाला विचारला.

-------------

फोटो (७६/ ७९ ) घोटीनजीक महामार्गाची दुर्दशा दाखवून अधिकाऱ्यांना जाब विचारताना खासदार हेमंत गोडसे. (छाया : राजू ठाकरे)

फोटो (७२) - ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेली या महामार्गावरील अपघातातील बळींच्या बातमीची ‘ई-कॉपी’ दाखविताना खासदार हेमंत गोडसे.

Web Title: Close the toll for a month until the highway is repaired; Otherwise ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.