लिपिक परीक्षेच्या सहा गुणांवर पाणी?
By Admin | Updated: November 2, 2015 22:06 IST2015-11-02T22:02:05+5:302015-11-02T22:06:15+5:30
उत्तरपत्रिकेतही चुका : प्रशासनाकडून उमेदवारांची समजूत

लिपिक परीक्षेच्या सहा गुणांवर पाणी?
नाशिक : जिल्हा प्रशासनाच्या वतीने गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या लिपिक व तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न व त्यासाठी पर्यायी सुचविलेल्या उत्तरांवर परीक्षार्थी उमेदवारांनी हरकत घेतल्यामुळे गडबडलेल्या प्रशासनाने नव्याने उत्तरपत्रिका उमेदवारांच्या पाहणीसाठी खुली केली; परंतु त्यातही तीन प्रश्नांच्या उत्तरांबाबत संभ्रम कायम राहिल्याने उमेदवारांनी आपली हरकत कायम ठेवली. परंतु या हरकतींमुळे परीक्षेचा निकाल लांबणीवर पडत असल्याचे पाहून प्रशासनाने हरकत घेणाऱ्या परीक्षार्थी उमेदवारांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
जिल्ह्यातील तलाठ्यांची रिक्त पदे व लिपिकांची पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर परीक्षा घेतली आहे. साधारणत: परीक्षा झाल्यानंतर परीक्षार्थी उमेदवारांनी दिलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे संगणकावरच उपलब्ध करून दिली जातात, जेणेकरून उमेदवारांना गुणांचा व निकालाचा अंदाज यावा, असा त्यामागचा हेतू असतो. जिल्हा प्रशासनाने महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिली उत्तरप्रत्रिका जाहीर करताच, त्यातील मराठी विषयाच्या सात प्रश्नांवर वीसपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी हरकती घेतल्या. प्रशासनाने उत्तरपत्रिकेत जाहीर केलेली उत्तरे व विविध मार्गदर्शक पुस्तकांमध्ये असलेल्या उत्तरांमध्ये फरक आढळून आल्याने गुण कमी होण्याच्या भीतीने उमेदवारांनी हरकती घेतल्या, त्यावर जिल्हा प्रशासनाने पुन्हा अभ्यास करून नव्याने दुसरी उत्तरपत्रिका जाहीर केली. त्यात पहिल्या उत्तरपत्रिकेतील चुका दुरुस्त करताना नव्याने पुन्हा चुकीची उत्तरे जाहीर करण्यात आली, त्यामुळे त्यालाही पुन्हा काही उमेदवारांनी हरकती घेऊन योग्य उत्तरे पुराव्यानिशी प्रशासनाकडे सादर केले आहे. परिणामी पहिली उत्तरपत्रिका गृहीत धरली तरी चूक ठरेल व दुसरी उत्तरपत्रिकाही चुकीचीही ठरू लागल्याने या परीक्षेचा निकाल कसा लावावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ज्या परीक्षार्थी उमेदवारांनी प्रश्नांच्या उत्तरांना हरकती घेतल्या त्यांना चर्चेसाठी पाचारण करून प्रशासनाने समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण उमेदवारांनी आपल्या उत्तरांवर ठाम राहून प्रशासनाला अपेक्षित असलेली उत्तरे कशी चुकीची आहेत हे पटवून दिले. एकतर तीन प्रश्नांचे गुण सर्व विद्यार्थ्यांना समान द्यावेत किंवा सहा गुण वगळून परीक्षेचा निकाल जाहीर करावा, अशी मागणीही या परीक्षार्थींनी केली आहे. (प्रतिनिधी)
प्रश्न बाद ठरविण्याचा प्रयत्न
स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी या परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार केली असल्यामुळे त्यात चूक असणे शक्यच नाही, असा दावा प्रशासनातील अन्य अधिकारी करीत असले तरी, लोकसेवा आयोगाच्या व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी हा मुद्दा खोडून काढला आहे. स्पर्धा परीक्षांसाठी ज्या पुस्तकांचा आधार घेऊन प्रश्न काढले जातात, त्याचाच अभ्यास करून परीक्षा दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु या वादावर सहमती न झाल्यास सहा गुणांचे प्रश्न बाद ठरवण्याचा विचारही प्रशासनाने सुरू केला आहे.