मागितले सफाईचे काम : पडेल ते काम करण्याची तयारी

By Admin | Updated: July 23, 2015 00:56 IST2015-07-23T00:56:12+5:302015-07-23T00:56:27+5:30

अंगणवाडी सेविकांचे महापौरांसह पदाधिकाऱ्यांना साकडे

Cleaning work: It is ready to work | मागितले सफाईचे काम : पडेल ते काम करण्याची तयारी

मागितले सफाईचे काम : पडेल ते काम करण्याची तयारी

नाशिक : तुटपुंज्या वेतनात आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, असा सवाल करत अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यात साफसफाईचे तसेच मनपाच्या रुग्णालयात सुरक्षा रक्षकाचे काम मिळावे यासाठी महापौरांसह पदाधिकाऱ्यांना साकडे घातले. कुंभमेळ्यात पडेल ते काम करण्याची तयारीही अंगणवाडी सेविकांनी दर्शविली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गोदाघाटासह भाविक मार्गावरील स्वच्छतेबाबतचा ठेका दिला आहे तर साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. नाशिक महापालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये सुमारे ८५० महिला काम करतात. या महिलांना सुमारे चार हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. परंतु या तुटपुंज्या मानधनात कुटुंबाचा खर्च भागविणे अवघड होऊन बसल्याचे अंगणवाडी सेविकांचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या रुग्णालये-दवाखान्यांमध्ये ७७ महिला सुरक्षा रक्षकांची भरती ई-निविदा पद्धतीने केली जाणार आहे. परंतु सदर पदे ठेकेदारी पद्धतीने भरण्याऐवजी अंगणवाडी सेविकांनाच महिला सुरक्षा रक्षकांचे काम देण्यात यावे. अंगणवाडी सेविका अंगणवाडी सांभाळून सुरक्षा रक्षकांचेही काम करण्यास तयार आहे. त्याचबरोबर सिंहस्थात साधुग्रामसह अन्य ठिकाणी साफसफाईचेही काम अंगणवाडी सेविकांना मिळावे, त्यात पडेल ते काम करण्याची तयारीही अंगणवाडी सेविकांनी दर्शविली आहे.
अंगणवाडी मुख्य सेविका जयश्री शेलार यांच्या नेतृत्वाखाली शांता जगळे, सुषमा खांबेकर, रत्ना रौंदळ, शरयू डांगळे, सुशीला काळे यांच्या शिष्टमंडळाने महापौर अशोक मुर्तडक, सभागृह नेते सलीम शेख यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)

Web Title: Cleaning work: It is ready to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.