चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी दिले एक दिवसाचे वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST2021-05-08T04:13:54+5:302021-05-08T04:13:54+5:30
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला सुपूर्द २.५ लाख कर्मचाऱ्यांचे सुमारे २५ कोटी जमा होणार लोकमत न्यूज नेटवर्क ...

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी दिले एक दिवसाचे वेतन
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन
मुख्यमंत्री निधीला सुपूर्द
२.५ लाख कर्मचाऱ्यांचे सुमारे २५ कोटी जमा होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे सुकेणे : कोरोना आपत्ती निवारणासाठी आपला खारीचा वाटा उचलत सुमारे २.५ लाख राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन सुमारे २५ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसीठी जमा केले असल्याची माहिती सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली.
कोरोना आपद्ग्रस्त स्थितीच्या या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील जनतेला धीर देत अतिशय संयमाने मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी प्रभावी उपाययोजना आखत आहेत. राज्यावरील संसर्गाचे हे संकट एकजुटीने दूर करण्यासाठी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्याला संघटनेने प्रतिसाद देत राज्यातील कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी निधी कमी पडू नये, यासाठी महाराष्ट्रातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचीही खंबीर साथ आहे, अशी ग्वाहीदेखील कर्मचाऱ्यांच्यावतीने भाऊसाहेब पठाण यांनी दिली आहे. ही संघटना मान्यताप्राप्त असल्यामुळे पगार कपातीसाठी व्यक्तिगत संमतीची गरज नाही तसेच अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःहून हे वेतन जमा करण्याचा मनोदय संघटनेकडे व्यक्त केला आहे. त्याशिवाय सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनीही त्यांचे मे महिन्यातील एक दिवसाचे निवृत्तीवेतन संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक तसेच उपसचिव टी. व्ही. करपते यांनाही पाठविण्यात आले आहे.
कोट...
राज्यातील कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी निधी कमी पडू नये, या संकटात आम्ही राज्य शासनाच्या पाठीशी आहोत. महाराष्ट्रातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचीदेखील खंबीर साथ आहे, म्हणून मे २०२१चे एक दिवसाचे वेतन सुमारे २५ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसीठी जमा केले आहेत.
- भाऊसाहेब पठाण, अध्यक्ष, चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ