त्रिशंकू जिल्हा परिषदेत सेनेचा सत्तेसाठी दावा
By Admin | Updated: February 24, 2017 02:56 IST2017-02-24T02:55:58+5:302017-02-24T02:56:14+5:30
निवडणुकीनंतर : भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादीवर आत्मपरीक्षणाची वेळ

त्रिशंकू जिल्हा परिषदेत सेनेचा सत्तेसाठी दावा
श्याम बागुल नाशिक
नाशिक : दीड दशक सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या जशा जागा घटल्या, तसेच कॉँग्रेसलाही मतदारांनी चौथ्या क्रमांकावर फेकत जिल्हा परिषदेत सेनेला सर्वाधिक जागा दिल्या खऱ्या; पण सत्ता स्थापनेसाठी भाजपाची मदत घेण्याची वेळ सेनेवर आणून ठेवल्याने आगामी पाच वर्षे जिल्हा परिषदेत सत्तेचा खेळ खेळण्यास सर्वपक्षीयांना मुभा मिळणार आहे.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत १८ व एक अपक्ष पुरस्कृत मिळून १९ जागा होत्या. त्या जागांमध्ये सहाने वाढ होऊन यंदा २५ जागा झाल्या आहे. ‘मिशन- ४१’ प्लसचा नारा दिलेल्या भाजपाला मात्र अवघ्या १५ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तीन मंत्री व एक खासदार मैदानात उतरूनही भाजपाला ‘मिशन- ४१’ प्लस गाठता आले नाही.
संघनात्मक पातळीवरील नादारीमुळे हे अपयश आले. शिवसेनेने तिकीट वाटपात नाशिक, निफाड व नांदगावला गडबड केल्याने शिवसेनेच्या जागा वाढू न शकल्याची जबाबदारी तिन्ही जिल्हाप्रमुखांवर येते. अर्थातच शिवसेना आपल्याशिवाय आहेच कोण याच अविर्भावात होती,त्याचाही फटका बसला. पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात पाऊल ठेवू पाहणारे अजिंक्य हेमंत गोडसे व समीर हरिश्चंद्र चव्हाण या दोघा खासदारपुत्रांची पावले पदार्पणातच अडखळली आहेत. पाच वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीची अवस्था त्यामानाने एकटेपणाची होती. भुजबळ तुरुंगात असल्यामुळे त्यांच्याशिवाय निवडणुकीला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादीने जागा घटणार नाही याची काळजी घेत, निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्यांनाच उमेदवारी दिली होती.जिल्ह्यात सर्व प्रथम याच पक्षाने गटवार मेळावे घेतले होते. त्यामुळे पक्षाच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत आठ जागा कमी होऊन १९ जागांवर समाधान मानावे लागले. चारवरून अकरापर्यंत पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाला मिनी मंत्रालयात ‘अच्छे दिन’ येणे अवघडच आहे. सेनेशी साथसंगत झाली तरच आणि तरच त्यांना सत्तेत सहभागी होता येईल, नाही तर मुंबईचा निकाल पाहता ‘मातोश्री’चा कल स्वबळावर लहान- मोठ्या पक्षांची जोडतोड करून आणि निवडून आलेल्या चार-दोन अपक्षांची मोट बांधून जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याकडे राहील, यात शंका नाही. या निवडणुकीत पहिल्यांदाच माकपाच्या सुरगाणा बाले किल्ल्याला राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपाच्या अनोख्या रणनीतीने हट्टी गटात दणका बसला. सातत्याने सुरगाण्यावर वर्चस्व असलेल्या माकपाला त्यांच्या हक्काचा एक गट घालवावा लागला आहे. कॉँग्रेसने त्यांच्या अस्तित्वासाठी जिल्हा परिषद निवडणूक लढविली, त्यांच्या पदरात सात जागा मिळाल्या, त्या पक्षाच्या नव्हे तर त्या त्या उमेदवारांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणावी
लागेल.