नाशिक : एक दशकानंतर शहराचे मार्च महिन्यात कमाल तपमान चाळिशी पार गेले असून, नाशिककरांना उन्हाचा तडाखा बसत आहे. मागील वर्षी दुष्काळसदृश स्थिती असल्यामुळे शहरातील विविध चौकाचौकांमध्ये उभारलेल्या पाणपोया सुरू करण्याचा महापालिका किंवा संबंधित संस्थांना मुहूर्त लागला नाही; मात्र यंदा दुष्काळी स्थिती नसतानाही भर उन्हाळ्यात या पाणपोया तहानलेल्याच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तब्बल दोन तपापूर्वी शहरातील चौकाचौकांत महापालिका प्रशासनाने पाणपोया बांधल्या आहेत. या पाणपोया सुरळीतपणे कार्यान्वित नसल्याचे सध्या चित्र आहे. विविध ठिकाणी नजरेस पडणाऱ्या गोलाकार पाणपोया केवळ शोभेपुरत्या राहिल्या आहेत. या पाणपोयांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. पडझड, नळांची दुर्दशा, पाण्याचा तुटवडा अशा एका ना अनेक समस्यांनी पाणपोया ग्रस्त झाल्या आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये असलेल्या पाणपोयांचा वापर बहुतांश जाहिरातदारांकडून स्वत:च्या व्यवसायाच्या जाहिराती लावण्यासाठी केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे या पाणपोया नेमक्या कशासाठी? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेने पाणपोई सुरू करण्याची मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे. शहरातील एकही पाणपोई सुस्थितीत नसून महापालिकेकडून यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.उन्हाची तीव्रता अधिक वाढणारयावर्षी उन्हाळा अधिक कडक असून, मार्च महिन्यातच पारा चाळिशीपार गेला आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेच्या विचाराने नागरिकांच्या मनात भीती निर्माण होत आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता एप्रिलपासून अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याक डून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शहरातील धूळखात पडलेल्या पाणपोया सुरू करण्याची गरज आहे. मोजक्याच ठिकाणी पाणपोईचे पाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील हॉटेलची वाट धरावी लागते किंवा पैसे मोजून पॅकबंद पाण्याची बाटली घ्यावी लागते. शहरात काही खासगी संस्थांकडून पिण्याचे पाणी नागरिकांना पाणपोईद्वारे उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. वकीलवाडीमधील काही व्यावसायिकांनी एकत्र येत कडुलिंबाच्या झाडाखाली ‘रांजण पाणपोई’ उभारली आहे. त्याचप्रमाणे मेळा बसस्थानकातदेखील पाणपोई सुरू करण्यात आली आहे. महामार्ग बसस्थानकात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पाणपोईची सुविधा करण्यात आली आहे.महापालिकेने जपावे सामाजिक भानएक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेने सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील धूळखात पडलेल्या पाणपोया पुन्हा सुरू कराव्या. पाणपोयांची डागडुजी व रंगरंगोटी व नळजोडणी करून पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे. उन्हाच्या झळा असह्य होत असताना जिवाची लाही लाही होत असून ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला यांना शहरातील रस्त्यांवर एकाही पाणपोईचा दिलासा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सामाजिक संस्थांची उदासीनता एरवी उन्हाळ्यामध्ये शहरासह विविध उपनगरांमध्ये विविध सामाजिक संस्था तसेच मित्रमंडळांकडून पांथस्थांच्या सेवेसाठी मुख्य चौकामध्ये व वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला, झाडाच्या सावलीत पाणपोई उभारली जात होती; मात्र अद्याप शहरासह उपनगरांमध्येही पाणपोयांची संख्या कमीच आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढूनदेखील अद्याप पाणपोईची संख्या अल्पच आहे. सामाजिक संस्था व मित्रमंडळांनी उदासीनता सोडून सामाजिक बांधिलकी म्हणून पाणपोई उभारण्यावर भर देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
शहरातील पाणपोया तहानल्या
By admin | Updated: March 29, 2017 23:47 IST