गिरणारे, सिन्नर, कसबे सुकणेला लवकरच महापालिकेची सिटी लिंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:28+5:302021-07-30T04:14:28+5:30
नाशिक महापालिकेची सिटी लिंक ९ जुलैपासून सुरू झाली आहे. या सेवेला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सध्या कोरोनाचे ...

गिरणारे, सिन्नर, कसबे सुकणेला लवकरच महापालिकेची सिटी लिंक
नाशिक महापालिकेची सिटी लिंक ९ जुलैपासून सुरू झाली आहे. या सेवेला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सध्या कोरोनाचे निर्बंध पूर्णत: शिथिल न झाल्याने त्याचा फटका बससेवेला बसत आहे. त्यामुळे ज्या मार्गावरील बससेवा फारशी फायदेशीर नाही आणि विशेषत: प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही तेथील बस बंद करून त्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कसबे सुकणे, सिन्नर आणि गिरणारे या ठिकाणी महापालिकेची बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. नाशिक शहरात सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळतो. शनिवार आणि रविवार लॉकडाऊन असल्याने सर्वाधिक आर्थिक फटका याच दिवशी बसत आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
एचएएल, ओझर तसेच देवळाली कॅम्पसाठी बस सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. जाताना बसला प्रवासी मिळणार असले तरी येताना मात्र रिकामी येणार असल्याने मोठा तोटा होणार आहे. त्यामुळे प्रतिप्रवासी अडीच हजार रुपये द्यावे असा प्रस्ताव संबंधिताना दिला आहे, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
इन्फो...
बसथांब्यावर आता फूड मॉल
महापालिकेच्या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असले तरी पाच ते सहा लाख रुपयांचा तोटा हाेत असल्याने तो भरून काढण्यासाठी बस थांब्याच्या जवळ छोटे फूड मॉल सुरू करण्यात येेणार आहे. मुंबईत ज्या प्रमाणे आरेच्या टपाऱ्या आहेत, त्याच धर्तीवर हे सुरू करण्यात येणार खासगीकरणात हे काम करण्यात येणार असल्याने महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे.
इन्फो
निमाणीचे भाडे नाही शेअरिंग पॅटर्न
पंचवटीतील निमाणी बसस्थानकाचा वापर नाशिक महापालिका करीत असून, त्याठिकाणी भाडे न भरता अन्य पर्यायांचा प्रस्ताव महापालिकेने सादर केला आहे. त्यानुसार निमाणी बसस्थानकाची देखभाल दुरुस्ती महापालिका करेल किंवा तेथील वीजबिल महापालिका अदा करेल असे तीन ते चार प्रस्ताव देण्यात आले आहेत.