नववसाहतीत कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:18 IST2020-07-14T20:13:56+5:302020-07-15T01:18:38+5:30
मालेगाव : सोयगाव व परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. सोयगाव परिसराचा हद्दवाढीत समावेश होऊन आता दहा वर्षांचा काल उलटला, मात्र अजूनही गटारी व मोकळ्या भूखंडांवरील कचºयाची समस्या ‘जैसे थे’च आहे.

नववसाहतीत कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त
मालेगाव : सोयगाव व परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. सोयगाव परिसराचा हद्दवाढीत समावेश होऊन आता दहा वर्षांचा काल उलटला, मात्र अजूनही गटारी व मोकळ्या भूखंडांवरील कचºयाची समस्या ‘जैसे थे’च आहे. इतर प्रभागांच्या तुलनेत या प्रभागाचा विस्तार मोठा आहे. यात सोयगाव नववसाहत, पार्श्वनाथनगर, तुळजाई कॉलनी, पवननगर, गोविंदनगर, दौलतनगर, सिद्धिविनायक कॉलनी, स्वप्नपूर्ती नगर, आनंदनगर आदी भागांचा समावेश होतो. या प्रभागातील थोड्याफार प्रमाणात रस्ते सोडले तर बहुतांश रस्त्यांची कामे अद्यापही मार्गी लागलेली नाहीत. प्रभागातील नागरी समस्या कायम आहे. नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. प्रभागात डास प्रतिबंधक फवारणी केली जात नसल्यामुळे डासांचे साम्राज्य कायम आहे. महापालिका हद्दीत समावेश होऊन आता दहा वर्षांच्या काळ लोटला, मात्र सोयगावाची दैना काही मिटलेली नाही. येथील बहुतांश भागात गेल्या अनेक वर्षांपासून गटारी नसल्यामुळे पावसाच्या पाण्याला वाट मिळत नाही. सोयगावसह अनेक भागात रस्ते पावसामुळे उखडले आहेत. गटारीच नसल्याने रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले आहे. लोकांना उखडलेल्या खडींमुळे अपघातांचा सामना करावा लागत आहे. पाच वर्षांत शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम रस्त्यांवर खर्च होत असताना रस्त्यांचा दर्जा कसा राखला जात नाही, हाच एकमेव नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे.
----------------
१ अनेक भागातील सोडिअम दिवे बंद अवस्थेत आहेत, तर अनेक ठिकाणी विजेच्या खांबांना काटेरी झुडपे, वेलींनी वेढा दिला आहे. शहरातील इंदिरानगर, पारिजात कॉलनी या भागात अनेक ठिकाणी रोहित्रांचे दरवाजे तुटलेले असून, त्यामुळे रहिवाशांना धोका उद्भवू शकतो.
२ प्रभाग क्रमांक १० मध्ये पवननगर भागात तर जयरामनगर येथे महिलांसाठी उद्यान साकारले आहे. मात्र अजून काही भागातील नागरिक सुसज्ज उद्यानाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रभागातील बंद पडलेले प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या परिसरात मोकळे पटांगण असल्यामुळे नागरिक या ठिकाणीच कचरा टाकून दुर्गंधी पसरवित आहेत.