सरकारी बँकांच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST2021-08-28T04:19:05+5:302021-08-28T04:19:05+5:30
कळवण : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचा संपूर्ण कारभार फक्त चारच कर्मचाऱ्यांवर सुरू असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड ...

सरकारी बँकांच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त
कळवण : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचा संपूर्ण कारभार फक्त चारच कर्मचाऱ्यांवर सुरू असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. बँकेतील कामकाजासाठी तासन्तास वेळ वाया जात असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे बँकेला सध्या शाखाधिकारी नसल्याने शेतकऱ्यांबरोबर व्यावसायिक, नोकरदार, बेरोजगार यांची कर्जप्रकरणे प्रलंबित आहे तर सुरक्षा रक्षकाला इतर दुसरी कामे करावी लागत असल्याने बँकेची सुरक्षाही धोक्यात आली आहे.
राष्ट्रीयीकृत बँक असल्याने शासकीय कर्मचारी, वयोवृद्ध महिला, पुरुष, शेतकरी असे कळवण व परिसरातील मोठ्या प्रमाणावर या बँकेचे ग्राहक आहेत. परिसरातील ग्राहकांचा नित्याचा संबंध असल्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी ग्राहक बँकेत येतात तसेच ऑनलाइनच्या इतर कामकाजासाठी या शाखेत ग्राहकांची मोठी गर्दी होत असते.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या शाखेतील काही कर्मचारी सेवानिवृत्त तर काही जणांची बदली झालेली आहे. बँकेचा कारभार पाहण्यासाठी रखवालदारासह एकूण नऊ/दहा पदे मंजूर आहेत. परंतु सध्या चारच कर्मचाऱ्यावर संपूर्ण बँकेचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे तातडीने या शाखेत कर्मचाऱ्यांची उपलब्धता करुन गैरसोय टाळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-------------------
स्टेट बँकेच्या कळवण शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने, एटीएम व इतर ऑनलाइनच्या कामासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर येथे कर्मचाऱ्यांची सोय करून नागरिकांची हेळसांड थांबवावी.
- डॉ.प्रा.मिलिंद वाघ, ग्राहक, शिरसमणी
------------
बँकेत चारच कर्मचारी असल्याने लोकांचे आर्थिक व्यवहार वेळेवर होत नाहीत त्यामुळे ग्राहकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांची कामे खोळंबली आहेत. सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून बिरुदावली लावणाऱ्या बँकेने लोकांना तत्पर सेवा द्यावी.
-- प्रकाश पगार,माजी शहराध्यक्ष, कळवण शहर काँग्रेस, (२७ कळवण एसबीआय)
270821\27nsk_26_27082021_13.jpg
२७ कळवण एसबीआय