माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 07:48 IST2025-11-23T07:47:49+5:302025-11-23T07:48:03+5:30
नाशिक शहरालगतच्या वडनेर दुमाला परिसरात धास्तीने बदलले जीवन;

माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
संजय पाठक
नाशिक : संपूर्ण घर पिंजऱ्यात बंद, मात्र, बिबट्या मोकाट! कधीही येतो, कधीही जातो, कुणाला झाडावर दिसतो, कुणाला रस्त्यावर. एकटे दुकटे फिरण्याची सोय नाही. सायंकाळी ६ वाजेच्या आत लहानमोठे सारेच जण घरात. पाण्याची बारी सोडायला जाणे धोकादायक. मुलांना सकाळी स्कूल व्हॅनपर्यंत सोडणे म्हणजे जिवाचा धाक. बिबट्या आलाय, तो इथं दिसलाय, तिथून जात आहे, माहितीसाठी व्हॉट्सॲपवर मेसेज आला की थरकाप! नाशिक महापालिका हद्दीतील सीमारेषेवर असलेल्या वडनेर दुमाला गावाची ही स्थिती तिथले भय दर्शवणारी आहे.
८ ऑगस्ट २०२५. रात्री ८ वाजेची वेळ. भगत मळ्यातील घराबाहेर खेळणाऱ्या तीन वर्षांच्या आयुषला बिबट्याने उचलले. गावाचा थरकाप उडाला. गावकरी एका हातात लाठ्याकाठ्या कोयते व दुसऱ्या हातात बॅटऱ्या घेऊन बिबट्याला मारायला निघाले. वनखात्याने पिंजरे लावले. आतापर्यंत तीन बिबटे जेरबंद झाले. परंतु हा विषय येथेच संपलेला नाही. परिसरातील ऊस, मका शेती, आर्टिलरी परिसरातील जंगल, गावाजवळील नाला यामुळे बिबट्याला पोषक वातावरण असल्याने किमान पाच ते सहा बिबट्यांचा येथे मुक्त संचार आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. हा प्रश्न सुटत नसल्याने अखेर नागरिकांनी त्यातल्या त्यात स्वसंरक्षणासाठी जे काय करता येईल ते केेले आहे. त्यांची जीवनशैलीच यामुळे बदलली. घरांना आणि शेतीला लोखंडी तारांचे कुंपण, सीसीटीव्ही, व्हॉट्सॲप ग्रुप आणि फिरताना, बॅटरी, काठ्या आणि कोयते ग्रामस्थांना आवश्यक ठरले आहे. वनखाते म्हणते बिबट्यासोबत जगायला शिका; पण ज्या माणसांनी स्वतःला पिंजऱ्यात कोंडून घेतलं, आपलं लेकरू बिबट्या केव्हाही उचलून नेईल या भीतीने जगणे मुश्कील झाले, त्या माणसांचं काय?
कोणी माणूस बाहेर गेला की, रात्री परतेपर्यंत भीती वाटते
भगत कुटुंबीयांनी घराला लोखंडी जाळ्यांचा पिंजरा करून घेतला आहे. मुलांनी त्याच्या बाहेर जायचंच नाही, तिथेच खेळायचे, मुलांचे बालपणच बंदिस्त झालंय, असे सांगताना आयुषच्या आई रेखा भगत यांना गलबलून आले. बिबट्या अजूनही शेतात येतो, घराच्या छतावर नाचतोे, त्यामुळे साऱ्यांना घाम फुटतो असे त्यांनी सांगितले. घरातील कोणी पुरुष बाहेर गेला की, रात्री परत येण्याची भीती वाटते, तो आलाच तर आधी फोन करतो मगच जाळीचा दरवाजा उघडतो, असे त्या म्हणाल्या. शाळेत जाण्यासाठी मुलांना व्हॅन आहे; परंतु वडनेर शिवरोडवर मुलांना नेण्याची भीती वाटते, असे पूजा भगत यांनी सांगितले. घरासमोर शेती, पण कामाला जाता येत नाही. पाणी सोडण्यासाठी आता मोबाइलचा वापर सुरू केला; परंतु बारी द्यायला जावेच लागते. भुईमूग काढणीसाठी मजूर आले तर तीन-चार जणांना काठ्या घेऊन त्यांचे संरक्षण करावे लागले, असे चंद्रकला भगत व अनिता भगत यांनी सांगितले.
दोन-पाच जण लाठ्याकाठ्या घेऊन असतील तरच काम करायला तयार
उसाचा मळा, त्या बाजूला कांदे लावलेले; पण काम करायला मजूर मिळत नाही. शेतात मजूर खाली वाकून काम करतात, त्यामुळे बिबट्याच्या टप्प्यात असतात. मजूर आता २-५ जण लाठ्याकाठ्या घेऊन असतील तरच काम करायला तयार होतात, असे याच गावातील बाजीराव पोरजे यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी मुलगा लघुशंकेला गेला तर समोर बिबट्या उभा...
जाधव मळ्यातील धोंडिराम जाधव यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी छोटा मुलगा लघुशंकेला गेला तर समोर बिबट्या उभा. आम्ही बॅटरीचा प्रकाश टाकल्यानंतर तो पळाला. शुक्रवारी (दि. २१) पहाटे बिबट्याच्या पावलांचे शेतात उमटलेले ठसे त्यांनी दाखवले. मध्यरात्री भाजीपाला विकण्यासाठी पिकअप घेऊन जायचे म्हटले तरी दोघे तिघे एकदम निघतात. पंधरा दिवसांपूर्वी मध्यरात्री यार्डात निघालो तेव्हा मोटारी समेारून कुत्रा चालला असे वाटले; पण बिबट्या होता. गाडीचे लाइट त्यावर टाकल्यावर पळाला. आधीच मळे भाग, पथदीप नाही, लाइट गेलेच तर लाइनमन येण्यास घाबरतो, त्याच्या बरोबर तीन-चार लोक लाठ्याकाठ्या घेऊन असले की तो काम करण्यास तयार होतो.