मालेगाव : शहर व परिसरात रोज होणाऱ्या तपमानातील बदलाने नागरिकांवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यातून गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस हद्दपार झाला आहे. आॅगस्टच्या सुरुवातीला रिमझिम पडणारा पाऊस अद्याप न परतल्याने नागरिकांपुढे आगामी काळात कसे जगावे? असा प्रश्न निर्माण झाला. त्यात दिवसभरात तपमान एकसारखे राहत नाही. त्यात अनेक चढउतार होत आहेत. यात कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन पडते. काहीवेळा जोरात वारे वाहू लागतात तर पुढच्या काही वेळात हवाही वाहत नाही. त्यामुळे गरम होते. या तपमानातील बदलाने नागरिकांच्या जिवाची तगमग वाढली आहे. नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. या तपमानाचा सर्वात मोठा परिणाम लहान मुले व वयोवृध्द नागरिकांवर होत आहे. यामुळे थंडी वाजणे, अंगात कापरे भरणे, खोकला, सर्दी आदि आजाराने नागरिक त्रस्त आहेत. त्यात डासांचे व लहान चिलट्यांचे साम्राज्य पसरले आहे. यावर उपाय योजण्याचे काम महानगरपालिकेचे आहे; मात्र त्यांना या गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे बोलले जाते. कॅम्प भागात असलेल्या अनेक वसाहतींमध्ये अनेक महिन्यांपासून औषध फवारणी करण्यात आलेली नाही. याविषयी लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नाही तर नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष दिले जात नाही. (प्रतिनिधी)
मालेगावी तपमान बदलाने नागरिक हैराण
By admin | Updated: August 23, 2015 22:23 IST