नागरिक भयभीत : जीर्ण जलवाहिन्या बदलण्यास सुरुवात; स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी जुन्या नाशकात रक्तमिश्रित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:46 IST2018-01-13T00:46:10+5:302018-01-13T00:46:49+5:30
नाशिक : जुन्या नाशकातील मोठा राजवाडा भागात रक्तमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने शुक्रवारी एकच गोंधळ उडाला. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

नागरिक भयभीत : जीर्ण जलवाहिन्या बदलण्यास सुरुवात; स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी जुन्या नाशकात रक्तमिश्रित पाणी
नाशिक : जुन्या नाशकातील मोठा राजवाडा भागात रक्तमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने शुक्रवारी एकच गोंधळ उडाला. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तथापि, परिसरातील बेकायदा कत्तलखाने आणि जीर्ण झालेल्या पाणीपुरवठ्याच्या जुन्या पाइपमधूनच हे रक्तमिश्रित पाणी येत असल्याचे उघड झाले. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पाणीपुरवठा अधिकाºयांसमवेत घटनास्थळी पाहणी केली. यावेळी जीर्ण झालेल्या जलवाहिनी बदलण्याच्या सूचना आमदार फरांदे यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहेत.
मोठा राजवाडा भागात तसेच अन्य काही भागांत रक्तमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने नागरिक संतप्त झाले. अनेकांनी नगरेसवक आणि अधिकाºयांकडे तक्रारी केल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार फरांदे यांनी घटनास्थळावर धाव घेत नागरिकांशी चर्चा केली. तसेच पालिका अधिकाºयांना घटनास्थळी त्या परिस्थितीशी अवगत केले. पोलिसांनी कत्तलखान्याच्या मालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांना पंचनामा करून, पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. तसेच पाणीपुरवठा विभागाने तत्काळ जीर्ण जलवाहिन्या बदलण्याची कार्यवाही सुरू केली. यावेळी पूर्व प्रभागाच्या सभापती शाहीन मिर्झा, नगरसेवक शोभाताई साबळे, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, निखिल पवार, परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते. या परिसरात अनेक बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असून, त्यातून निघणारे रक्तमिश्रित पाणी हे जुन्या जीर्ण जलवाहिन्यांमधून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. त्यामुळे फरांदे यांनी तातडीने या परिसरातील जलवाहिन्या बदलून टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच अनधिकृतपणे सुरू असलेले कत्तलखाने बंद करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.