बस थांबत नसल्याची नागरिकांची तक्रार
By Admin | Updated: August 23, 2015 22:26 IST2015-08-23T22:25:52+5:302015-08-23T22:26:28+5:30
बस थांबत नसल्याची नागरिकांची तक्रार

बस थांबत नसल्याची नागरिकांची तक्रार
ठेगोडा : विंचूर प्रकाशा महामार्गावरील ठेगोडा येथे सटाणा आगार तसेच नंदूरबार, साक्री, नवापूर आधी आगाराच्या जलद बसेस थांबत नाहीत याबाबत ग्रामपंचायतने वेळोवेळी पत्र देऊन तसेच ग्रामस्थांनी ग्रामसभेत बस थांबा मिळणे बाबत ठराव देऊनही बस थांबा मिळत नाही. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांच्या आभार दौऱ्यातही ग्रामस्थांनी जलद बस थांबा मिळणे बाबत मागणी केली होती; मात्र सरकारी बाबूंनी ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखिवली.
गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही ठेग्ांोड्यातील एसटी बसला थांबा मिळत नाही; मात्र नाशिककडून येतांना सटाण्यापर्यंतचे तिकीट काढले व सटाण्याकडून जाताना लोहोणेरचे तिकीट तर मात्र ठेग्ांोडा येथे बस थांबते अन्यथा ठेंगोडेकरांना लोहोणेर येथे उतरून पायपीट करत ठंगोडा येथे यावे लागते. ठेंगोड्यातील जलद बस थांब्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे; मात्र संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही. येथील जागृत देवस्थान श्री सिद्धिविनायक मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत होऊन शासनाने मंदिर विकासासाठी लाखो रूपयाचा निधी दिला. येथील मंदिरात जिल्हा व जिल्हा बाहेरून भाविक दर्शनासाठी येतात; मात्र गावात बस थांबत नसल्याने लोहोणेर येथूनच भाविकांनाही पायपीट करीतच यावे लागते .
त्याचबरोबर गावातील ग्रामस्थांनादेखील बाहेर गावाहून आल्यावर रात्री अपरात्री लोहोणेर येथूनच पायपीट करीत यावे लागते ज्येष्ठ नागरिक व वृध्द महिलांना लोहोणेर ते ठेंगोडा हा प्रवास त्रासदायक ठरतो. याबाबत ज्येष्ठ नागरिक संघाकडूनही बस थांब्याची मागणी अनेकदा करण्यात आली; मात्र एसटी प्रशासन जनतेच्या प्रश्नांकडे गंभीरपणे बघत नसल्याने १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत बस थांब्याच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा झाली.
एसटी प्रशासन ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद देत नसल्याने यावर तोडगा काढण्यासाठी ठेंगोडा ग्रामपंचायतच्या सरपंच सुनीता ठाकरे यांनी परिवहन मंत्र्यानाच बस थांबा मिळणेबाबत निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
एसटी प्रशासन आतातरी दखल घेऊन ठेंगोड्यात जलद बसला थांबा देते का याकडे आता गावाचे लक्ष आहे. (वार्ताहर)