नागरिक भयमुक्त : अवघे चार पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 18:16 IST2021-01-17T18:14:40+5:302021-01-17T18:16:20+5:30
त्र्यंबकेश्वर : सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीनुसार तालुक्यात केवळ चार रुग्ण बाधित असल्याने येत्या २/३ दिवसात त्र्यंबकेश्वर तालुका कोरोना ...

नागरिक भयमुक्त : अवघे चार पॉझिटिव्ह
त्र्यंबकेश्वर : सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीनुसार तालुक्यात केवळ चार रुग्ण बाधित असल्याने येत्या २/३ दिवसात त्र्यंबकेश्वर तालुका कोरोना मुक्तीच्या वाटेवर असल्याचे पंचायत समितीच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.
सध्याच्या ताज्या आकडेवारीनुसार त्र्यंबक तालुक्यात आतापर्यंत ५३८ रुग्ण पॉझिटिव्ह होते. त्यापैकी त्र्यंबकेश्वर शहरात १८७ तर जिल्हा परिषद हद्दीत ३५१ मिळून ५३८ रुग्ण पॉझिटिव्ह होते. यापैकी ५०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १ तर होम आयसोलेटेड २ असे चारच ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, शाळा सुरु होत असल्याने आतापर्यंत टप्प्याटप्प्याने शिक्षकांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. त्यातील बहुतेक जणांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत. सध्या ३० शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे सर्व शिक्षक आजारी किंवा संशयित रुग्ण नसून वर्गांवर पाठवण्याअगोदर त्यांची तपासणी करणे हा उद्देश तालुका शिक्षण विभागाचा व आरोग्य विभागाचा असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाट व आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांनी दिली. कोविड -१९ आटोक्यात आणण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे, डॉ. पाटील व आरोग्य कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
कोरोना गो !
उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी किरण जाधव, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. बर्वे , तालुका वैद्यकीय अधिकारी, नोडल अधिकारी डॉ. रेखा सोनवणे सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी ह्यकोरोना गोह्ण असा व्हॉटसॲप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर कोरोना अपडेट टाकले जात असून त्या माध्यमातून तालुक्यातील ॲक्टिव रुग्णांची काळजी घेता येत होती. तसेच तालुक्यासह शहरात प्रशासनाला खबरदारी घेऊन उपाययोजना करता येत होत्या.