सिडको प्रभाग सभापतिपदी सेनेचे सुदाम डेमसे बिनविरोध
By Admin | Updated: May 20, 2017 02:03 IST2017-05-20T02:03:47+5:302017-05-20T02:03:56+5:30
प्रभाग सभापतींच्या निवडणुकीत सेनेच्याच उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने सिडको प्रभाग सभापतिपदी सेनेचे सुदाम डेमसे यांची बिनविरोध निवड झाली.

सिडको प्रभाग सभापतिपदी सेनेचे सुदाम डेमसे बिनविरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : महापालिकेच्या सिडको प्रभागात शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने सिडको प्रभागात सेनेचेच वचर्स्व कायम असून, आज झालेल्या प्रभाग सभापतींच्या निवडणुकीत सेनेच्याच उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने सिडको प्रभाग सभापतिपदी सेनेचे सुदाम डेमसे यांची बिनविरोध निवड झाली.
महापालिका निवडणुकीत सर्वत्र भाजपाची लाट असतानाही सिडको प्रभागात मात्र सेनेने आपले वर्चस्व कायम राखत एकहाती सत्ता मिळविली आहे. यामुळे साहजिकच सिडको प्रभागावर सेनेचाच भगवा फडकणार यात शंकाच नव्हती, परंतु सेनेकडून नवीन चेहऱ्यांना की अनुभवी सदस्यांना संधी मिळणार याबाबत उत्सुकता कायम होती. सिडको विभागात एकूण सहा प्रभाग असून, यात प्रभाग क्रमांक २४, २५, २७, २८, २९ व ३१ आदींचा समावेश आहे. या सहा प्रभागांतील २४ नगरसेवकांमध्ये सेनेचे १४, भाजपा ९ व राष्ट्रवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. सेनेच्या नगरसेवकांमध्ये सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, प्रवीण तिदमे, चंद्रकांत खाडे, श्यामकुमार साबळे, दीपक दातीर, सुदाम डेमसे, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, किरण गामणे आदिंचा समावेश आहे. स्थायी समितीवर शिवसेनेकडून नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी व प्रवीण तिदमे यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे इतर सदस्यांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. परंतु दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री बबन घोलप यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक सुदाम डेमसे यांचे नाव शिवसेनेच्या बैठकीत जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार डेमसे यांनी सेनेकडून उमेदवारी दाखल केली होती. दरम्यान, दुसऱ्या क्रमांकाची मते असलेल्या भाजपासह अन्य कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता. यामुळे दोन दिवसांपूर्वीच सुदाम डेमसे यांची सिडको प्रभाग सभापतिपदी निवड होणार हे निश्चित होते. शुक्रवारी अपर आयुक्त जोतिबा पाटील व नगरसचिव ए. पी.वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार(दि.१९) दुपारी साडेबारा वाजता निवडणूक घेण्यात आली. यावेळी डेमसे यांचा एकमेव अर्ज असल्याने माघारीच्या पंधरा मिनिटांचा कालावधी झाल्यावर अपर आयुक्तपाटील यांनी सुदाम डेमसे यांची सिडको प्रभाग सभापतिपदी बिनविरोध जाहीर केली.