गॅस दरवाढीमुळे पुन्हा पेटली चुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 10:16 PM2021-03-02T22:16:52+5:302021-03-03T00:52:41+5:30

देवगाव : ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळून पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, यासाठी मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत घराघरांत मोफत गॅसजोडणी दिली. मात्र, आता गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने ती केवळ शोभेची वस्तू बनली असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाने पुन्हा एकदा चुली पेटवत गॅस सिलिंडरला अडगळीची खोली दाखविली आहे.

Chul re-ignited due to gas price hike | गॅस दरवाढीमुळे पुन्हा पेटली चुल

गॅस दरवाढीमुळे पुन्हा चुलीकडे वळालेली गृहिणी.

googlenewsNext
ठळक मुद्देवाढत जाणारी महागाई चिंतेची बाब

देवगाव : ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळून पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, यासाठी मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत घराघरांत मोफत गॅसजोडणी दिली. मात्र, आता गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने ती केवळ शोभेची वस्तू बनली असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाने पुन्हा एकदा चुली पेटवत गॅस सिलिंडरला अडगळीची खोली दाखविली आहे.

सुरुवातीला दोन-पाच रुपयांची दरवाढ नंतर पंधरा-वीस रुपयांपर्यंत पोहचली. त्यानंतर पंधरवड्यापूर्वी तर थेट ५० रुपयांची दरवाढ झाली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी या योजनेतून मोफत गॅस जोडण्या देण्यात आल्या होत्या. आता दरवाढ करताना या कुटुंबाना गृहीतच धरण्यात आलेले नाही. सुरुवातीला सिलिंडरच्या किमती ४०० रुपयांचा घरात होत्या. आता त्या ८०० रुपयांवर गेल्याने लाभार्थींना महिन्याला एवढी रक्कम आणायची कुठून? असा प्रश्न पडला आहे. गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढतच असल्याने प्रत्येकाचे बजेट कोलमडले आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतित असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे संकट उभे राहिले आहे.
स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करीत गोवऱ्या व सरपणासाठी फिरावे लागते. महिलांचे हे हाल थांबवून व जंगलांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र, सिलिंडरच्या भाव गगनाला भिडल्यामुळे उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ मिळालेली कुटुंबे आता गॅस महागल्याने पुन्हा चुलीच्या दिशेने वळू लागली आहेत.

लाभर्थ्यांचे बजेट कोलमडले
उज्ज्वला योजनेचे बहुसंख्य लाभार्थी हे ग्रामीण भागातील आहे. आर्थिक जनगणनेच्या आधारावर त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. लाभार्थी कुटुंबाचे महिन्याचे उत्पन्न जेमतेम असते. त्यात घरातील दररोज लागणारा किराणा, भाजीपाला याचा ताळमेळ बसविणे कठीण होत असताना आता गॅस सिलिंडरचे दर कसे परवडणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महिन्याला जेमतेम तीन-साडेतीन हजारांची मिळकत असणाऱ्या कुटुंबात सिलिंडरसाठी ८०० रुपये आणायचे कुठून? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

महिनानिहाय गॅस दरवाढ
डिसेंबर - ५९७ रुपये
जानेवारी - ६९७ रुपये
फेब्रुवारी - ७७२.५० रुपये
मार्च - ९२२ रुपये

उज्ज्वला योजनेतून सिलिंडर मिळाल्याने खूप आनंद झाला होता. मात्र, दररोज वाढत जाणारी महागाई चिंतेची बाब ठरत आहे. त्यात आता गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने गॅस वापरणे कठीण झाले आहे. महागडा गॅस परवडत नसल्याने पुन्हा चुलीचा वापर करावा लागत आहे.
- योगीता रोकडे, गृहिणी

 

Web Title: Chul re-ignited due to gas price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.