भ्रमणध्वनीच्या अतिवापराने बळावले आजार

By Admin | Updated: November 17, 2015 22:30 IST2015-11-17T22:29:19+5:302015-11-17T22:30:52+5:30

सोशल नेटवर्किंग : कपोलकल्पित माहितीचे बोगस अकाउंटच्या माध्यमातून प्रसारण

Chronic illness caused by mobile phone use | भ्रमणध्वनीच्या अतिवापराने बळावले आजार

भ्रमणध्वनीच्या अतिवापराने बळावले आजार

 द्याने : अनेकजण इंटरनेटच्या सतत संपर्कात राहू लागले आहेत. माहिती तंत्रज्ञानातील बदलांमुळे मोबाइलमध्येही अनेक बदल झाले आहेत. सोशल नेटवर्किंगच्या सेवा मोबाइलमध्ये उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागात मोबाइलद्वारे इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे. क्षणाक्षणाला आपल्या भोवतालच्या घटना, मोबाइलवरून काढलेली आणि मोबाइलवर शेअर केलेली वेगवेगळी छायाचित्रे, वैयक्तिक अशी इत्यंभूत माहिती ग्रामीण भागातही फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंगवर लाखो युवक अपडेट करताना सर्रास दिसत आहेत; मात्र एखाद्या समाजकंटकांच्या हातात हे माध्यम सापडल्यानंतर त्याचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो याचा कुणीही विचार करत नाही.
ई-मेल तपासणे, जगभरातील माहिती घेत राहणे, यासाठी इंटरनेटचा वापर योग्य आहे. गेल्या काही वर्षांपासून सोशल नेटवर्किंगचा वापर शहरी युवा पिढीप्रमाणेच ग्रामीण युवकांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे.
मोबाइलसारख्या माध्यमातून तासन्तास सोशल नेटवर्किंगचा वापर करणारे हजारो युवक ग्रामीण भागातही पहावयास मिळत आहेत. या वापरामागे विविध कारणेही आहेत. यामुळे अपडेट राहायला मदत होते. शिवाय, नवनवीन माहिती मिळण्यास मदत होतेच; मात्र आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ व मित्रांशी अनोख्या संवादाचे माध्यम मिळाल्याचा विशेष आनंद ग्रामीण युवकांमध्ये पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरापासून ते जिल्हा परिषद ते अगदी आमदार-खासदारांपर्यंत अनेक नेते-कार्यकर्ते इमेज बिल्डिंगसाठी या सोशल साईटचा खूप मोठा वापर करीत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहेच. त्यामुळे सोशल नेटवर्किंग हे अनेकांसाठी एक व्यसन होऊन बसले आहे.
त्याचाच फायदा समाजकंटक घेत आहेत. त्यामुळे या व्यसनाच्या आहारी जायचे आणि समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांचे इप्सित साध्य करून द्यायचे की, केवळ सकारात्मक वापर करायचा हे प्रत्येकाने ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. समूह भावनेशी कसा साधणार संवाद सोशल मीडियाद्वारे धार्मिक भावना, राष्ट्रीय मूल्यव्यवस्था विस्कटण्याचा प्रयत्न होत असेल तर सरकार व समाज दोघांनाही स्वस्थ बसून राहता येणार नाही. त्यामुळे सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी हे जेवढे खरे आहे, त्याप्रमाणेच लोकांनीही समंजस सहभाग दिला पाहिजे.
नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे सोशल नेटवर्किंगचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही आहेतच; मात्र या फायद्या-तोट्याचे गणित एवढी प्रचिती येऊनही तितकेसे गांभीर्याने घेतले जात नाही. बोगस अकाऊंटचा सुळसुळाट सोशल मीडियावरची कुठली माहिती ही गंभीरपणे घेण्याच्या लायकीची आहे आणि कुठली नाही याचा सारासार विचारच होत नाही. मोबाइलवर तयार करण्यात आलेली कपोलकल्पित माहिती बोगस अकाऊंटच्या माध्यमातून अनेकांच्या मोबाइलवर आदळत असते. त्याच्या अस्सलपणाची खात्री कोण देणार आणि ती खात्री करून तरी कशी घ्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Chronic illness caused by mobile phone use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.