चिमुकल्यांना लावली वाचनाची गोडी...‘
By Admin | Updated: October 14, 2015 23:34 IST2015-10-14T23:33:20+5:302015-10-14T23:34:39+5:30
चिमुकल्यांना लावली वाचनाची गोडी...‘

चिमुकल्यांना लावली वाचनाची गोडी...‘
हल्लीची मुलं वाचतच नाही...’ अशी तक्रार घराघरातून ऐकू येते; पण खरोखर मुलांनी वाचावे, यासाठी मात्र कोणी पुढाकार घेत नाही. वाचनाचे अफाट वेड असलेल्या स्वाती गोरवाडकर यांचे मात्र तसे नाही. मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून त्या जिद्दीने काम करीत आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेत सहभागी झाल्यानंतर असा उपक्रम लहान मुलांसाठीही राबवण्याची कल्पना गोरवाडकर यांच्या डोक्यात आली. हा विचार त्यांनी ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे प्रणेते विनायक रानडे यांच्याकडे बोलून दाखवला आणि त्यातूनच नवी योजना जन्माला आली, तिचं नाव ‘माझं ग्रंथालय - बालविभाग’! नाशिकमध्ये खास लहान मुलांसाठी वर्षभर चालणारा एकही उपक्रम नाही, घरात टीव्ही, इंटरनेटमुळे मुले वाचत नाहीत, हे लक्षात घेऊन गोरवाडकर यांनी ११० ग्रंथपेट्या तयार केल्या. प्रत्येक पेटीत लहान मुलांना भावतील अशी अकबर-बिरबल, पंचतंत्र, जातककथा यांसारखी १५ मराठी आणि १० इंग्रजी अशी मिळून २५ पुस्तके ठेवली. योजनेच्या सभासदांनी दर दीड महिन्याने एकत्र यायचे आणि पेटी बदलून घ्यायची. या दीड महिन्यात मुलांनी त्या पेटीतील जमतील तेवढी पुस्तके वाचायची, असे या उपक्रमाचे स्वरूप. वाचनालयातून एका वेळी एकच पुस्तक मिळते; पण अशी एकदम २५ पुस्तके हाती आल्यानंतर मुलांना हवी ती पुस्तके वाचण्याचा पर्याय मिळतो आणि त्यातून त्यांची वाचनाची आवडही वाढते, असे गोरवाडकर सांगतात.
मूळ धुळ्याच्या असलेल्या स्वाती यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड. त्यांना आई-वडिलांकडून हा वारसा मिळाला. वाचनातून मिळणाऱ्या आनंदाला हल्लीची मुले पारखी झाली आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. सध्या या उपक्रमाचे ११० सभासद आहेत. दर दीड महिन्याने पुस्तके बदलण्यासाठी एकत्र जमणाऱ्या मुलांना निरनिराळ्या कलांचा परिचय करून द्यावा, असा विचार त्यांच्या डोक्यात आला. मग त्यातूनच शाडू मातीच्या गणेशमूर्ती, पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवणे, विनातेल व विनागॅस स्वयंपाक करणे अशा निरनिराळ्या विषयांच्या कार्यशाळा घेण्यास सुरुवात झाली. आता नववी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही ग्रंथयोजना सुरू करण्याचा गोरवाडकर यांना मनोदय आहे.
त्या सांगतात, पुस्तकांच्या वाचनातून मिळणाऱ्या आनंदाची दुसऱ्या कशाशी तुलनाच केली जाऊ शकत नाही. टीव्ही, इंटरनेटमुळे मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेनासा झाला आहे. बरीच मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्याने त्यांना मराठीतले बरेचसे शब्द माहीतच नसतात. त्यामुळे काही मुले ‘अडीच’च्या ऐवजी चक्क ‘साडेदोन’ म्हणतात. अशा मुलांची भाषा सुधारण्यासाठी, त्यांच्यातली सर्जनशीलता, कल्पकता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. ही फक्त पुस्तक देवाणघेवाण नाही, तर देशाचे उद्याचे नागरिक घडवण्याचा छोटासा प्रयत्न आहे...
गोरवाडकर यांची ही धडपड म्हणूनच कौतुकास्पद ठरते !