उमेदवाराच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांनीच खुलासा करावा- गिरीष महाजन

By संकेत शुक्ला | Published: March 14, 2024 08:20 PM2024-03-14T20:20:53+5:302024-03-14T20:21:13+5:30

नाशिकची जागा परंपरेनुसार यंदाही शिवसेनेकडेच!

Chief Minister should disclose name of the candidate - Girish Mahajan | उमेदवाराच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांनीच खुलासा करावा- गिरीष महाजन

उमेदवाराच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांनीच खुलासा करावा- गिरीष महाजन

नाशिक: लोकसभेसाठी युती असल्यापासून नाशिकची जागा शिवसेनेच्या वाटेला आहे. त्यामुळे यंदाही ती त्यांच्याच वाटेला असेल. फक्त खा. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवाराच्या नावाची केलेली घोषणा अधिकृत आहे की, नाही याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच करावे असे सांगत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी या वादात पडणे टाळले. 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या सिंहस्थ बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले की यंदाही पंतप्रधान मोदी यांच्या नावावर निवडून येण्याची खात्री प्रत्येक उमेदवाराला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा आम्ही मोठ्या फरकाने जिंकू. राज्यातील २० जागांवरचे उमेदवार जाहीर झाले आहेत. उर्वरित जागेबाबत केंद्रीय समितीची चर्चा सुरू आहे. अजूनही तीन जागांबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे अंतिम यादी जाहीर झालेली नाही. येत्या दोन तीन दिवसांत त्याचीही घोषणा होईल, राज्यातील आमच्या विजयाचे प्रमाण कायम राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंकजा मुढे यांना तिकीट देण्याचा निर्णय श्रेष्ठींचा आहे. त्या आमच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी पक्की होती. रक्षा खडसे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर खडसे कुटूंबाने शरद पवार यांची भेट घेतली याबाबत विचारले असता पक्षाच्या निवड समितीने रक्षा खडसे यांना संधी दिली आहे. त्यानंतर त्यांच्या कुटूंबाने कोणाला भेटावे हा त्यांचा प्रश्न आहे, असे उद्गार काढले.

सिंहस्थासाठी त्र्यंबकेश्वर येथील अतिक्रमणांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यासह केंद्राकडून मोठा निधी येण्याची अपेक्षा आहे. यानिमित्ताने नाशिक, त्र्यंबकचा शाश्वत विकास व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे. नाशिकसाठीही शाश्वत विकासावर भर देण्यात येईल असे त्यांनी सांगीतले.

अजूनही काही बॉम्बस्फोट होतील
अशाेक चव्हाण येण्याआधी आपण त्याचे भाकीत केले होते. आता आचारसंहिता येत्या दोन तीन दिवसांत लागण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थीतीत दुसऱ्या पक्षातील आणखी काही नेते आमच्या संपर्कात आहे. निवडणुकीदरम्यान अजूनही काही बॉम्बस्फोट हेऊ शकतात, असे संकेत देतानाच राहूल गांधी यांच्या सभेला उद्धव ठाकरे आले होते का असा गर्भित प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Chief Minister should disclose name of the candidate - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.