लोकमत न्यूज नेटवर्क, येवला (जि. नाशिक) : केवळ राजकीय स्वार्थासाठी आपला वापर होत असेल आणि माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्याचवेळी पक्षात अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हेच निर्णय घेतात, असे सांगत पक्षाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली.
नागपूर येथील अधिवेशनातून निघून आमदार भुजबळ हे मंगळवारी येवला या आपल्या मतदारसंघात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाच्या भूमिकेविषयी आणि मिळणाऱ्या वागणुकीविषयी जाहीर नाराजीच व्यक्त केली. आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा काही मंत्रिपदाचा नाही तर हा अस्मितेचा आहे, असे सांगत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असेही भुजबळ म्हणाले.
अजित पवार यांनी आपल्याला लोकसभा लढण्यास सांगितले होते, तेव्हाच त्यांना नाही म्हटले होते. मग तेव्हाच त्यांनी राज्यसभेचा शब्द द्यायला हवा होता. आता राज्यसभा सांगतात हे मी काय दूध पितो का? असा सवाल त्यांनी केला. मकरंद पाटील यांना मंत्रिपद द्यायचे व त्यांच्या भावाला खाली बोलावून घ्यायचे, हा काय पोरखेळ आहे का? असे म्हणत त्यांनी पक्ष नेतृत्वावर तोंडसुख घेतले.
भुजबळांना काँग्रेस प्रवेशाची ऑफर
नागपूर : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ यांना काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस प्रवेशाची खुली ऑफर दिली आहे. भुजबळ यांच्यासारखी व्यक्ती आमच्या सोबत काम करायला तयार असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे राऊत यांनी मंगळवारी स्पष्ट केले.