शिक्षक बॅँकेकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2016 00:03 IST2016-03-31T00:01:48+5:302016-03-31T00:03:21+5:30
मुदत ठेवी बुडवल्या : दोंदे भवनची मिळकत जप्त करण्याचा महापालिकेचा ठराव

शिक्षक बॅँकेकडून फसवणूक
नाशिक : वीस वर्षांपूर्वी महापालिकेने बुडीत झालेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेकडून सुमारे ३ कोटी ९१ लाख रुपयांच्या मुदत ठेवी वसूल करण्यासंदर्भात बॅँकेची मिळकत असलेल्या आचार्य दोंदे भवनची इमारत जप्त करून विक्री करण्यासंबंधी गहाणखत लिहून घेतले होते. परंतु, बॅँकेच्या संचालक मंडळाने महापालिकेला अंधारात ठेवत दोंदे भवनची जागा परस्पर विकसित करण्यासाठी देऊन फसवणूक केल्याचे शिक्षण समितीच्या निदर्शनास आले आहे. बॅँकेकडून व्याजासह झालेली १२ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम महापालिकेला परत मिळत नाही तोपर्यंत विकसनाच्या कामाला स्थगिती देण्याचा आणि सदर मिळकत जप्त करून ताब्यात घेण्याचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सभापती संजय चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिकेची शिक्षण समिती आॅगस्ट २०१५ मध्ये गठीत झाल्यानंतर पहिलीच सभा मंगळवारी सभापती संजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सभेत प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेकडे असलेल्या मुदत ठेवीचा मुद्दा उपस्थित झाला असता समितीने त्याविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले. याबाबत सभापती संजय चव्हाण यांनी सांगितले, सन १९९६-९७ या काळात महापालिकेने प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेकडे ३ कोटी ९१ लाख ४९ हजार रुपयांच्या मुदतठेवी ठेवल्या होत्या. दरम्यान, बॅँक बुडीत निघाल्यानंतर महापालिकेने वारंवार मुदत ठेवी परत मिळण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार, ८ मे १९९८ रोजी बॅँकेचे चेअरमन बाबासाहेब पवार, व्हाइस चेअरमन मंगला गोजरे आणि व्यवस्थापक रणजित दुबे यांच्यासह संचालक मंडळाने महापालिकेला गहाणखत नोंदवून दिले होते. या गहाणखतात बॅँकेने मुदत ठेवी परत न केल्यास महापालिकेने बॅँकेची मिळकत असलेल्या टिळकवाडीस्थित आचार्य दोंदे भवनची इमारत जप्त करून विक्री करावी, असे लिहून देण्यात आले होते. सदर मुदत ठेवीची व्याजासह रक्कम आजमितीला सुमारे १२ कोटी ३३ लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. बॅँकेने महापालिकेच्या नावाने गहाणखत लिहून दिल्यानंतर सदर मिळकतीवर महापालिकेचा बोजा असताना बॅँकेच्या व न्यासाच्या संचालक-विश्वस्त मंडळाने महापालिकेला अंधारात ठेवत परस्पर मिळकत पाडून ती विकसित करण्यासाठी सुयश डेव्हलपर्सला दिली आहे.