पाठलाग : प्रयत्नांची शिकस्त करीत शिडी लावून काढले बाहेर

By Admin | Updated: December 27, 2014 00:49 IST2014-12-27T00:48:53+5:302014-12-27T00:49:09+5:30

कुत्र्याची शिकार करताना बिबट्या पडला विहिरीत

Chase: Struggling the effort, laid out the ladder | पाठलाग : प्रयत्नांची शिकस्त करीत शिडी लावून काढले बाहेर

पाठलाग : प्रयत्नांची शिकस्त करीत शिडी लावून काढले बाहेर

 जायखेडा : आखतवाडे ता. बागलाण येथे कुत्र्याची शिकार करताना रात्रीच्या अंधारात विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्या कुत्र्यासह खोल विहिरीत पडला बिबट्याने मोठ्या कौशल्याने विहिरीतील कपारीत आसरा घेत आपले प्राण वाचवले मात्र कुत्र्यास आपला जीव गमवावा लागला.
बागलाण तालुक्यात बिबट्या विहिरीत पडण्याच्या घटना गेल्या काही दिवसात कमालीच्या वाढल्या आहेत. असाच भक्ष्याच्या मागे धावताना आखतवाडे येथील तुलसीराम महादू खैरनार यांच्या शेतातील विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या पडला. याचा जोरात आवाज झाल्याने खैरनार यांना जाग आली. विहिरीत कुत्रा पडला असावा असे वाटल्याने त्यांनी बॅटरीच्या सहाय्याने विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत कुत्र्यासह बिबट्या पडला असल्याचे निदर्शनास आले.
कुत्र्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला होता. हि बाब लक्षात येताच त्यांनी रात्रीच वनविभागास कळविले, मात्र रात्री कोणीही आले नाही. कडाक्याच्या थंडीत थंडगार पाण्यात रात्रभर मृत्यूशी झुंज देत विहिरीच्या कपारीत बसून बिबट्याने कसाबसा आपला जीव वाचवला.
यानंतर सकाळी हि वार्ता गावात समजताच बघ्यांनी विहिरी जवळ गर्दी केली. सकाळी विहिरीत पडलेल्या कुत्र्यास प्रथम काढण्यात आले, मात्र दुर्दैवाने कुत्रा पाण्यात बुडाल्याने आधीच मेला होता. त्यानंतर बिबट्यास विहिरीबाहेर काढण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी व शेतकऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करीत, विहिरीत शिडी सोडून बिबट्याला विहिरीतून वर येण्याचा मार्ग मोकळा करून दिला. शिडीचा आधार घेत बिबट्या अखेर दुपारी विहिरीबाहेर आला आणि बघता बघता या बिबट्याने सुटकेचा निस्वास सोडीत बाजूच्या शेतात एकच धूम ठोकली. यावेळी वनरक्षक एम. बी. शेख, वनपाल दि. के. नदाळे, एल. पी. शेडगे, के. पी. काकुळते, पोलीस शिपाई पी. एन. कुशारे, पी. एन. साने. व शेतकऱ्यांनी बिबट्यास विहिरीबाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती. (वार्ताहर)

Web Title: Chase: Struggling the effort, laid out the ladder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.