साहित्य संमेलनांमध्ये परिवर्तन आवश्यक
By Admin | Updated: December 21, 2015 00:22 IST2015-12-21T00:21:11+5:302015-12-21T00:22:18+5:30
वाहरू सोनवणे : लोकलढा सांस्कृतिक चळवळ संमेलनप्रसंगी प्रतिपादन

साहित्य संमेलनांमध्ये परिवर्तन आवश्यक
नाशिक : देशातील जाती-धर्मामध्ये स्वतंत्र अस्तित्वाची लढाई सुरू आहे़ समाजमनावर ठसा उमटविण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या साहित्य संमेलनांमध्ये समाजाचा इतिहास, परंपरा व संस्कृती समाजासमोर ठेवली जाते़त्यामुळे या साहित्य संमेलनांना परंपरावादी स्वरूप प्राप्त होत असून, ते बदलून परिवर्तनवादी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी केले़
लोकलढा सांस्कृतिक चळवळीतर्फे पंचवटीतील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सभागृहात आयोजित करण्यात आलेले पहिले दलित, आदिवासी, भटके, ओबीसी संयुक्त साहित्य संमेलन रविवारी (दि़२०) पार पडले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना संमेलनाध्यक्ष सोनवणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पूर्वी केवळ हिंदी साहित्य संमेलने होत असत मात्र कालपरत्वे विविध समाज, जाती व भाषिकांचीही संमेलने सुरू झाली. माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी असा सूर या साहित्य संमेलनामधून व्यक्त होतो़
दलित, आदिवासी वा भटके आहोत यापेक्षा आपण सर्व मानव आहोत ही भावना प्रत्येकामध्ये रुजावी असा या संमेलनापाठीमागचा उद्देश असतो़ संघर्ष व सहकार्य ही मानवी जीवनपद्धती आजही आदिवासींमध्ये असल्याने ते आम्हीच मूळ असल्याचे सांगतात़ मात्र काळानुसार त्यांची जीवन व कार्यपद्धती यामध्येही बदल झाले आहेत़ आदिवासी स्त्रियांचा विचार केला तर त्यांच्यावर आजही अनेक बंधने पुरुषप्रधान संस्कृतीने घातलेली आहेत़ विलासी व भोगवादी वृत्ती, संपत्तीचा हव्यास यामुळे प्रेमावर आधारित आदिवासी व्यवस्थेचा ऱ्हास झाला़
स्त्रियांना गुलाम म्हणून नव्हे तर माणूस म्हणून वागणूक देण्यातच आदिवासींचा विकास व हित आहे़ यासाठी दलित साहित्य अत्यंत उपयोगी असते तरी त्यात परिवर्तन गरजेचे, असे सोनवणे यांनी सांगितले़ यावेळी व्यासपीठावर बार्टीचे महासंचालक डॉ. डी. आर. परिहार, मंत्रालयातील अपर सचिव चंदनशिवे, नगरसेवक दामोदर मानकर, विक्र ीकर सह.आयुक्त कैलास चतूर, प्रा. अनिल सिरसाठ उपस्थित होते़ दुसऱ्या सत्रात आजचा सांस्कृतिक दहशतवाद आणि दलित, आदिवासी, भटके, कष्टकऱ्यांच्या एकजुटीसमोरील आव्हाने या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत कुमार शिराळकर होते. प्रा. राजेंद्र ढवळे, प्रा. डी. ए. दळवी यांनी परिसंवादात सहभाग घेतला. यानंतर तिसऱ्या सत्रात पार पडलेल्या कविसंमेलनात जिल्हातील निमंत्रित व नवोदित कवींनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)