Chandwad-Manmad road mishap | चांदवड-मनमाड रस्त्याची दुरवस्था
चांदवड-मनमाड रस्त्याची दुरवस्था

ठळक मुद्देशिर्डी ते कळवण बसचा गिअर दांडा तुटल्याने प्रवाशांचा खोळंबा

चांदवड : चांदवड ते मनमाड रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असूून, त्यात चांदवड ते दुगाव हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे, तर ठिकठिकाणी महाकाय खड्डे प्रवाशांना दुखणे व अपघात निर्माण करीत असल्याने या रस्त्याने प्रवास करणारे कंडाळवाणे ठरत आहे. त्यातच दुगाव-चांदवडमधील खड्ड्यांमुळे बसच्या गिअरचा दांडा तुटला. ढिम्म प्रशासनाला कधी येणार जाग, असा संतप्त सवाल वाहनचालक व प्रवाशी करीत आहेत.
दि. ७ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथून दुपारी २ वाजता सुटणारी शिर्डी - कळवण बस दुगावी साडेचार ते ५ वाजेदरम्यान आली. मात्र खड्डे चुकवत असताना वारंवार गिअर बदलावा लागत असल्याने त्याचा दांडा म्हसोबा मंदिराजवळ तुटला. तेथून कशीबशी ही बस चांदवड स्थानकात आणण्यात आली. या रस्त्याने हजारो नागरिक ये जा करीत असतात. बसच्या गिअर बॉक्सचा दांडा तर बदली करता येईल; पण प्रवशांचे मणके, हाडे तुटल्यास त्याचे काय? या रस्त्याने प्रवास नसल्याने प्रवाशी व वाहन चालक त्रस्त झाले आहे.
या रस्त्याची अनेकवेळा मलमपट्टी झाली, तर चांदवड बसस्थानक परिसरात मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा असताना पुन्हा रात्रीतून खड्डे बुजविण्यात आले होते. या रस्त्यासाठी अनेक कसरती शासन दरबारी झाला आहेत मात्र अद्याप या रस्त्यांचा तिढा काही केल्या सुटत नाही, असे चित्र दिसत आहे. या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मोलाचे सहकार्य करून हा रस्ता शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्ग करून तो नॅशनल हायवेकडे वर्ग केल्याने एवढे मोठे काम होऊ शकले आता या कामाची निविदा नव्हे तर प्रत्यक्ष टेंडर व वर्कआॅर्डर निघाली असून, जालना येथील कंपनीने हे काम घेतले आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल व या भागातील जनतेचा दळणवळणाची सुविधा चांगली होईल, असे आश्वासन दिले असताना या रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामास अद्याप सुरुवात नसल्याने अजून किती जणांना अपंगत्व येणार याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशी व वाहनचालक करीत आहेत.

Web Title: Chandwad-Manmad road mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.