गोदापात्रातील पानवेलीमुळे चांदोरी-सायखेडा पुलाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 18:31 IST2019-07-02T18:30:49+5:302019-07-02T18:31:12+5:30
दुर्लक्ष : पानवेली हटविण्याची मागणी

गोदापात्रातील पानवेलीमुळे चांदोरी-सायखेडा पुलाला धोका
चांदोरी : येथील गोदापात्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पात्रातील वाढत्या पानवेलीमुळे चांदोरी-सायखेडा पुलाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, पात्रात रसायनमिश्रित पाणी येत असल्याने जलचरांनाही धोका उत्पन्न झाला आहे.
उन्हाळ्यात राज्यातील जवळपास सर्वच नद्यानी तळ गाठला होता. चांदोरी परिसरातून जाणारे गोदापात्रही कोरडे पडले होते. मात्र. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्या-नाल्यांना पाणी वाढले आहे. गोदावरी पात्रातही पाण्याची पातळी वाढत चालली आहे. मात्र, सदर पाण्याचा प्रवाह हा रसायनमिश्रित असल्याने पाण्याला फेस येऊन दुर्गंधी येत आहे. त्यामुळे पात्रातील जलचरांना धोका उत्पन्न झाला आहे. याचबरोबर गोदावरी पात्रात चांदोरी-सायखेडा पुलाला अडकून असलेल्या पानवेली पाण्याला दूषित करत आहेत. पात्रात मोठ्या प्रमाणावर पानवेली वाढल्या असून पाण्याचा प्रवाह वाढल्यास त्याला अडथळा येऊन पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पात्रातील पानवेली काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पानवेलीचा अडथळा निर्माण झाल्याने पाणी आसपासच्या शेतात घुसून नुकसान होत आहे. पानवेली काढण्यासंबंधी जलसंपदा विभागाला वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.
अस्तित्व धोक्यात
मराठवाडा, अहमदनगर व नाशिकची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीपात्रात वाढत्या पाणवेली व वाढते प्रदूषण या मुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रदुषणामुळे नागरिकांचेही आरोग्याला धोका आहे. सदर पानवेली तातडीने हटवणे गरजेचे आहे.
- सागर गडाख, अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन समिती