नाशिक : कुंभमेळ्यातील पर्वणीत देशभरातून कोट्यवधी भाविक नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये येणार आहेत़ साधू-महंतांच्या दर्शनासाठी प्रचंड संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणेला सावध रहावे लागणार आहे़ या अतिरिक्त कामामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तणाव येणार असून, सर्वांनी आव्हान समजून सामोरे जाण्याचा सल्ला औद्योगिक कीर्तनकार तथा व्यवस्थापनतज्ज्ञ संदीप भानोसे यांनी दिला़कुंभमेळा कालावधीत पोलीस यंत्रणेवर येणाऱ्या ताणतणावामध्ये स्वत:ची काळजी कशी घ्यावी यासाठी पोलीस मुख्यालयात भानोसे यांच्या ‘गरु डझेप’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, समोरची परिस्थिती कितीही विदारक असली तरी गोंधळून न जाता त्यास सामोरे गेले पाहिजे. कुंभमेळा कालावधीत अफवा वा गैरसमज पसरू नये, यासाठी भाविकांशी सुसंवाद साधायला हवा़ पोलिसांनी कामातील तणाव आव्हान समजून त्यास आनंदाने सामोरे जावे़यावेळी निशिकांत सूर्यवंशी व मिलिंद तारे यांनी ‘ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस उपआयुक्त विजय पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या हस्ते झाले. यामध्ये पोलीस आयुक्तालयातील सुमारे दोनशे कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
कामातील तणाव हे आव्हान
By admin | Updated: August 22, 2015 23:50 IST