‘तोतया’ महिलेस शोधण्याचे आव्हान
By Admin | Updated: May 20, 2017 01:55 IST2017-05-20T01:54:49+5:302017-05-20T01:55:00+5:30
पंचवटी : तब्बल १४ बेरोजगारांना लाखो रुपयांना गंडा घालणारी महिला संशयित रूपाली शिरूरे ही फरार झाल्याने तिचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

‘तोतया’ महिलेस शोधण्याचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : गोव्याचे मुख्यमंत्री नातेवाईक असल्याचे सांगून व स्वत: लष्करात नोकरीला असल्याची बतावणी करून तब्बल १४ बेरोजगारांना लाखो रुपयांना गंडा घालणारी महिला संशयित रूपाली शिरूरे ही फरार झाल्याने तिचा शोध घेण्याचे आव्हान म्हसरूळ पोलिसांसमोर आहे.
दिंडोरीरोड परिसरात राहणाऱ्या सोपान ठाकरे या बेरोजगार युवकासह अन्य बेरोजगारांना गोवा राज्यात खाणीत अभियंता म्हणून नोकरीला लावून देण्याच्या नावाखाली म्हसरूळ गजपंथ परिसरात राहणाऱ्या शिरूरे नामक महिलेने तब्बल १४ बेरोजगार युवकांची फसवणूक करून सुमारे १४ लाख २० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी दिंडोरीरोड परिसरात राहणाऱ्या सोपान ठाकरे याने म्हसरूळ पोलिसांत तक्रार दिली होती.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मामा असल्याचे सांगून शिरूरे या तोतया महिलेने ठाकरे याच्यासह अन्य बेरोजगारांकडून लाखो रुपये जमा केले व त्यानंतर अभियंता म्हणून काम झाले असल्याचे सांगून महिला फरार झाली. संशयित महिला ज्या भ्रमणध्वनीवरून बेरोजगारांना संपर्क करायची ते भ्रमणध्वनी क्रमांक बंद असल्याने त्यातच पूर्वी राहत असलेल्या ठिकाणाहून महिलेने काढता पाय घेतल्याने म्हसरूळ पोलिसांसमोर या महिलेचा शोध घेण्याचे आव्हान ठाकले आहे.
चार ते पाच दिवसांपूर्वीच म्हसरूळ पोलीस ठाण्याचा पदभार गुन्हे शाखेतून आलेले पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी घेतला असून दोन दिवसांपूर्वीच एका पोलीस पुत्रासह अन्य चौघा संशयितांनी परिसरात शस्त्रास्त्रे घेऊन दहशत निर्माण केल्याचा प्रकार उघडकीस आला़ त्यानंतर लगेचच युवकांना नोकरीस लावून देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.