तपमानाने गाठली चाळिशी

By Admin | Updated: March 26, 2017 23:49 IST2017-03-26T23:49:23+5:302017-03-26T23:49:46+5:30

नाशिक : शहराच्या कमाल तपमानाचा रविवारी (दि.२६) उच्चांक झाला. हंगामातील सर्वाधिक ४०.१ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद पेठरोडवरील हवामान खात्याच्या कार्यालयात करण्यात आली.

Chalishi reached by temperature | तपमानाने गाठली चाळिशी

तपमानाने गाठली चाळिशी

नाशिक : शहराच्या कमाल तपमानाचा रविवारी (दि.२६) उच्चांक झाला. हंगामातील सर्वाधिक ४०.१ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद पेठरोडवरील हवामान खात्याच्या कार्यालयात करण्यात आली. गेल्या बुधवारपासून तपमानाचा पारा ३८च्या घरात होता; मात्र रविवारी पाऱ्याने चाळिशी गाठली.  वाढत्या तपमानामुळे नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका मागील काही दिवसांपासून जाणवत असून, उष्म्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. रविवारी दिवसभर शहरातील सर्वच खासगी कार्यालयांसह दुकानांमध्येही तसेच चारचाकी चालवितानाही वातानुकूलित यंत्रांच्या वापरावर भर दिला जात होता. त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रांतील नोकरदारांसह बालगोपाळांकडून शीतपेय व थंड फळहार करून शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न नाशिककरांकडून केला जात होता. दिवसभर शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले होते. यामुळे खासगी वाहतुकीबरोबरच एसटी महामंडळाच्या बसेसमध्येही तुरळक गर्दी दिसून आली. एकूणच नाशिककरांनी रविवारी ११ वाजेनंतर घराबाहेर पडणे टाळले. वाढत्या उष्म्याबरोबरच वाराही बंद असल्यामुळे नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत होती. संध्याकाळी ६ वाजेनंतरच नागरिक घराबाहेर पडले. यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह उद्याने, बाजारपेठा गजबजल्या होत्या. संध्याकाळनंतर फाळके स्मारक, नेहरू वनोद्यान, खंडोबा टेकडी उद्यान, मुक्तिधाम, सोमेश्वर मंदिर आदि ठिकाणी गर्दी झाली होती. रविवारची सुटी नागरिकांनी संध्याकाळनंतर आपल्या कुटुंबासमवेत ‘एन्जॉय’ केला. संध्याकाळी थोड्याफार प्रमाणात वारा सुटल्याने वातावरण काहीसे अल्हाददायक झाले होते. हंगामातील सर्वाधिक तपमानाची नोंद रविवारी झाली. अद्याप शहराच्या तपमानाचा पारा ३८ अंशांच्या आसपास स्थिरावत होता.
 

Web Title: Chalishi reached by temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.