पंचवटी : म्हसरूळ परिसरातील प्रभातनगर येथील गोकुळ अपार्टमेंटमध्ये घरफोडी करून पळालेल्या चोरट्याने पोलिसांना चकवा देण्यासाठी चक्क ओमकारनगर येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सज्ज्यावर लपून बसण्याचे धाडस केले खरे; मात्र ‘कानून के हात लंबे होते हैं’ या उक्तीप्रमाणे म्हसरूळ पोलिसांनी लपून बसलेल्या या चोरट्याला शिताफीने पकडून बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी पहाटेच्या सुमाराला थोरात नर्सरीसमोर गोकुळ अपार्टमेंट येथे राहणारे स्वप्नील बेदरकर हे कामानिमित्ताने बाहेरगावी गेले असता दोघा चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली. बेदरकर यांच्या घरात चोरटे शिरल्याचे शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ म्हसरूळ पोलिसांना माहिती कळविली. त्यानंतर पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रगस्तीवर असलेल्या अधिकारी व गुन्हा शोध तसेच बीट मार्शलच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर परिसरात चोरट्यांचा शोध घेतला असता बुलडाणा जिल्ह्यातील राजेंद्र वाघमारे या संशयिताचा पाठलाग करून ताब्यात घेतले, तर दुसरा संशयित हा ओमकारनगरच्या दिशेने पळाल्याने पोलिसांनी त्यादिशेने धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सावळा, नंदू जाधव, भुसाळ, संजय पवार, माळोदे, राजेश लोखंडे, कांगणे, गावित, रोकडे, विधाते आदिंनी ही कारवाई केली आहे. (वार्ताहर) परिसरातील साईशिल्प इमारतीजवळून पोलीस जात असताना एक संशयित इमारतीच्या सज्ज्यावर लपून बसल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी बॅटरी चमकावून खात्री केली. त्यानंतर त्याला शिडीच्या साहाय्याने खाली उतरविले व त्याची चौकशी केली असता त्याने नामदेव अंबोरे असे नाव सांगून वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगत एका सहकाऱ्याच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघाही घरफोड्या करणाऱ्यांना ताब्यात घेत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
चोरट्यांना ठोकल्या बेड्या
By admin | Updated: March 28, 2017 01:06 IST