विभागात म्युकरमायकोसिसचे बळी शतकपार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:32+5:302021-07-07T04:17:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण जून महिन्याच्या उत्तरार्धापासून कमी झाले आहे. मात्र, पूर्ण मे ...

विभागात म्युकरमायकोसिसचे बळी शतकपार !
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण जून महिन्याच्या उत्तरार्धापासून कमी झाले आहे. मात्र, पूर्ण मे महिना आणि जून महिन्याच्या पूर्वार्धात म्युकरमायकोसिसग्रस्त झालेल्या अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील ६५ नागरिकांचा तर विभागातील १०९ बळींचा समावेश आहे.
म्युकरमायकोसिसवरील औषधाच्या अपुऱ्या पुरवठ्यावर न्यायालयाने संताप व्यक्त करूनही अद्यापही इंजेक्शनचा तुटवडा दूर होऊ शकलेला नाही. त्यामुळेच नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या बळींची संख्या ६५ वर पोहोचली आहे. रुग्णाला प्रतिदिन ८ इंजेक्शनची आवश्यकता असताना केवळ एक ते दोन इंजेक्शन देण्यात येत असल्याने जिल्ह्यात या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असून, मृत्यूदर १७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोरोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात मे महिन्यापासून मोठी वाढ झाली आहे. म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येने तसेच त्यावर आवश्यक असणाऱ्या ॲम्फोटेरिसिन इंजेक्शनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार आणि शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांना लाखोंचा भुर्दंड सहन करावा लागत होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यातील ८ रुग्णालयांचा अंतर्भाव महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केला आहे. मात्र, ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन्स पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑपरेशनच्या दुहेरी खर्चाने तसेच हॉस्पिटल्समध्ये राहण्याचा कालावधी इंजेक्शन्सअभावी लांबत असल्याने म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांचे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. सामान्य आणि गरीब कुटुंबातील नागरिकांनी तर उपचाराच्या बिलांच्या धास्तीने उपचार सोडून दिल्याचीही उदाहरणे आहेत. एकदा ऑपरेशन केल्यानंतरही जर पुरेशा प्रमाणात इंजेक्शन्स मिळाले नाही, तर अनेक रुग्णांवर पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत असल्याने अनेक म्युकरमायकोसिसग्रस्तांना कुटुंबाला अधिक खर्चात टाकणेदेखील शक्य होत नसल्याने त्यांची मोठीच मानसिक कुचंबणा होते.
इन्फो
विभागातील बळींचे वास्तव
विभागात आतापर्यंत गेलेल्या १०९ बळींमध्ये निम्म्याहून अधिक ६५ बळी हे एकट्या नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल २२ बळी हे नगर जिल्ह्यातील, जळगाव जिल्ह्यातील १६ बळी आणि धुळे जिल्ह्यातील ६ बळींचा समावेश आहे. विभागातील केवळ नंदुरबार जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या एकाही बळीची नोंद नसल्याने केवळ हा आदिवासी जिल्हाच म्युकर मायकोसिसच्या तडाख्यातून काही प्रमाणात वाचला आहे.
इन्फो
विभागात एकूण ११५३ रुग्ण
नाशिक विभागात एकूण ११५३ म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्ण आढळून आले होते. त्यातही निम्म्याहून अधिक ६०९ रुग्ण नाशिकचे, २७७ नगरचे, १२९ जळगावचे, १०१ धुळ्याचे, तर ३७ नंदुरबारचे रुग्ण आहेत. त्या ११५३ पैकी ६५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर विभागात ३५६ रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. त्यातही १८३ रुग्ण नाशिकमध्ये, ५९ नगरमध्ये, ६२ जळगावमध्ये, २७ धुळ्यात तर २५ रुग्ण नंदुरबारमध्ये उपचार घेत आहेत.