Celebrate Dussehra on the ninth day this year! | यंदा नवव्या दिवशी साजरा करा दसरा!

यंदा नवव्या दिवशी साजरा करा दसरा!

ठळक मुद्देतिथीची क्षयवृद्धी : घटस्थापनेचा मुहूर्त दुपारी १.४५ वा. पर्यंत

नाशिक : सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आले तरी घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत ९ किंवा १० दिवसांचे अंतर असते. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक दिसून येतो. यावर्षी घटस्थापनेपासून ९ व्या दिवशी दसरा आला असून असा प्रसंग यापूर्वी अनेकदा आल्याची माहिती दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी दिली आहे. दरम्यान, यंदा घटस्थापनेचा मुहूर्त शनिवारी (दि.१७) ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे ५ वाजेपासून ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत आहे.
येत्या शनिवारी (दि. १७) घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. शनिवारी ब्राह्म मुहूर्तापासून पहाटे ५ ते दुपारी १.४५ पर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल.दि. २० रोजी ललिता पंचमी असून दि. २३ रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. दि.२४ रोजी महाष्टमीचा उपवास आहे तर २५ आॅक्टोबर रोजी रविवारी नवरात्रोत्थापन आहे , शिवाय दसरा सुद्धा रविवारीच आहे. यावर्षी नवव्या दिवशीच दसरा आलेला आहे. यंदाचे वर्षी कोरोनाच्या संकटामुळे किंवा अशौचामुळे ज्यांना १७ आॅक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच संपल्यावर दि. १९ , २१, २२ किंवा २४ आॅक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व २५ रोजी नवरात्रोत्थापन करावे. विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे २५ आॅक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्र माचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.१८ ते ३.०४ वाजे दरम्यान आहे.
इन्फो
‘महाष्टमी उपवास’
यावर्षी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे भागामध्ये दिनांक २३ आॅक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास असून उर्वरित महाराष्ट्रामध्ये २४ आॅक्टोबर रोजी महाष्टमी उपवास करावा, अशी माहिती दाते पंचांगकर्ते यांनी दिली आहे. महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी २३ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते. त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूूजन दिलेले आहे. मात्र दुर्गाष्टमी २४ आॅक्टोबर रोजी आहे.

 

Web Title: Celebrate Dussehra on the ninth day this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.