विसर्जन मिरवणूकीवर सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 16:43 IST2018-09-19T16:42:41+5:302018-09-19T16:43:14+5:30
सिन्नर शहर व तालुक्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर रविवारी होणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणूकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. सिन्नर शहरातून निघणाºया गणेश विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी सिन्नर पोलिसांकडून शहरातून संचलनही करण्यात आले.

विसर्जन मिरवणूकीवर सीसीटीव्हीची नजर
जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांच्या संकल्पनेतून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव पार पाडण्यासाठी सिन्नर, एमआयडीसी व वावी पोलिसांनी विविध उपक्रम राबविले. ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती करण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. आता विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नगरपरिषद व पोलीस यंत्रणेने यंत्रणा राबविण्यास प्रारंभ केला आहे. रविवार (दि. २३) दुपारी साडेतीन वाजता मळहद्द भागातून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. सुमारे ३० गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. गंगावेस ते वावीवेस या मिरवणूक मार्गात सुमारे १२ सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरु आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ५ अधिकारी व ८० पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. २२ लोकांना तडीपारीच्या नोटीसा बजाविण्यात आल्या असून सुमारे ७५ जणांवर प्रतिबंधनात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.