महापालिकेच्या मिळकतींवर सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:44 IST2017-08-25T00:44:12+5:302017-08-25T00:44:21+5:30
महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालये, जलशुद्धीकरण केंद्रे, जलकुंभ, प्रमुख उद्याने आदींच्या सुरक्षिततेसाठी सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

महापालिकेच्या मिळकतींवर सीसीटीव्हीची नजर
नाशिक : महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालये, जलशुद्धीकरण केंद्रे, जलकुंभ, प्रमुख उद्याने आदींच्या सुरक्षिततेसाठी सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
शहरातील प्रमुख चौकांसह बाजारपेठांमध्ये पोलीस आयुक्तालयामार्फत सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेनेही आपल्या मिळकतींच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्यावर नजर ठेवण्याकरिता सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर सीसीटीव्ही कॅमेरे महापालिकेचे राजीव गांधी भवन, सहाही विभागीय कार्यालये,चार जलशुद्धीकरण केंद्र, १०५ जलकुंभ, प्रमुख उद्याने, प्रमुख वास्तू याठिकाणी बसविण्यात येणार आहेत. या सीसीटीव्ही कॅमेराचा नियंत्रण कक्ष पंचवटी विभागीय कार्यालयात उभारण्यात येणार आहे. सदर जागेची पाहणी गुरुवारी (दि.२४) मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण व शहर अभियंता उत्तम पवार यांनी केली. महापालिका व पोलीस यंत्रणा यांनी स्वतंत्रपणे सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचे नियंत्रण एकाच ठिकाणाहून होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.