पावसाअभावी पिके करपू लागली
By Admin | Updated: August 30, 2015 23:32 IST2015-08-30T23:31:38+5:302015-08-30T23:32:24+5:30
खरीप धोक्यात : तीव्र पाणीटंचाई; पाऊस होत नसल्याने बळीराजा हवालदिल

पावसाअभावी पिके करपू लागली
पावसाअभावी पिके करपू लागलीखरीप धोक्यात : तीव्र पाणीटंचाई; पाऊस होत नसल्याने बळीराजा हवालदिलनाशिक : सिन्नर तालुक्यातील निमगाव-सिन्नर, बारागावपिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी, के.पा.नगर या गावांसह पूर्व भागात पावसाअभावी खरिपाची पिके जळून जात असल्याचे चित्र आहे. सलग पाचव्या वर्षी पावसाने वक्रदृष्टी केल्याने खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. शेतीच्या पाण्यापेक्षाही शेतकऱ्यांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पशुधन वाचविणेही अवघड होऊन बसले आहे.
सलग दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, खरिपाच्या पेरण्यांचा खर्च मातीत गेल्याने बळीराजावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. परिसरात सध्या बाजरी, मका, सोयाबीन, उडीद, मूग आदिंसह कडधान्यासारख्या जिरायती पिकांची लागवड केली आहे. मात्र या पिकांना संजीवनी देण्याइतपतही पाऊस नसल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना खरिपात केवळ खाण्यापुरते उत्पादन मिळत होते. यावर्षी वरुणराजाने पुन्हा वक्रदृष्टी केल्याने शेतकऱ्यांनाही विकत धान्य घेण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी बॅँका, पतसंस्था किंवा नातेवाइकां कडून हातउसने पैसे घेऊन खरिपाच्या पेरण्या केल्या. मोलामहागाचे बी-बियाणे, खते विकत घेतली; मात्र मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात झालेल्या पावसानंतर सुमारे दोन-अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बाजरी, मका, सोयाबीन यांच्यासह कडधान्याची उतरून पडलेली पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. काही भागातील पिके दाणे भरण्याच्या स्थितीत आहेत; मात्र पाण्याअभावी त्यांचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निमगाव-सिन्नर, बारागावपिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी, के.पा.नगर या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तलाव, बंधारे कोरडेठाक आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य आहे. विहिरींना पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बारागावपिंप्री व परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. (लोकमत चमू)
सिन्नर तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ३६ टक्के पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून केलेल्या खरिपाच्या पेरण्या वाया गेल्यानंतर आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे उर्वरित महिनाभराच्या पावसाच्या कालावधीत मोठे पाऊस होऊन बंधारे, तलाव भरले जावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
बारागावपिंप्री परिसरात सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात टॅँकरद्वारे दिवसाआड प्लॅस्टिकचा दोनशे लिटरचा फक्त एक ड्रम भरून पाणी मिळते. पिण्याच्या पाण्याबरोबर रोजच्या वापरासाठीच्या पाण्याचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न पडतो. टॅँकरच्या फेऱ्या वाढवून देण्याची गरज आहे.
- प्रमोद वानरे, ग्रामस्थ, बारागावपिंप्री
नायगाव : सिन्नर तालुक्यातील निमगाव-सिन्नर, केपानगर, बारागावपिंंप्री व सुळेवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. टॅँकरच्या फेऱ्या सुरळीत करण्याची मागणी निमगावचे सरपंच बाळासाहेब सानप यांनी केली आहे.
पूर्व भागात गेल्या सुमारे पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे. यंदाही वरुणराजाने पाठ फिरविल्याने शेतीसह ग्रामस्थांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील नाले व विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. परिणामी ग्रामस्थांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.