पैसे भरण्याच्या बहाण्याने रोकड लंपास
By Admin | Updated: August 2, 2016 01:51 IST2016-08-02T01:50:18+5:302016-08-02T01:51:07+5:30
पंचवटीतील प्रकार : पाच जण पोलिसांच्या ताब्यात

पैसे भरण्याच्या बहाण्याने रोकड लंपास
पंचवटी : मशीनमध्ये पैसे कसे भरायचे माहिती नसल्याचे सांगत पैसे खात्यात जमा करण्यासाठी मदत मागण्याचा बहाणा करून बँकेत आलेल्या ग्राहकांचे पैसे हातोहात लांबवणाऱ्या कल्याण येथील टोळीचा पोलिसांनी छडा लावला असून, यातील पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
सीसीटीव्ही व चारचाकी वाहनाच्या वर्णनावरून पोलिसांनी कल्याण येथून प्रतापसिंग शंकरसिंग राजपूत, परवेज अकबर अली, हसमत अली बरकत अली शेख, महेंदी अकबर अली शेख, अर्जुन वाल्मीक पाटील (सर्व राहणार मारळगाव, कल्याण) या संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यापैकी चार जण उत्तर प्रदेशातील आहेत, तर पाटील जळगाव जिल्ह्यातील पाचोरे येथील रहिवासी आहे. गेल्या आठवड्यात बोरगड येथील सूर्यकांत माळी पैसे भरण्यासाठी दिंडोरी रोडवरील स्टेट बँकेत आले असताना दोघा संशयितांनी आम्हाला अर्जंट गावाला पैसे पाठवायचे असल्याचे सांगत हातातील नोटांसारखा दिसणारा बंडल माळी यांच्याकडे देत त्यांच्या हातातील २८ हजार रुपयांची रोकड घेतली. माळी यांनी सहकार्य म्हणून बंडल घेत त्यातील नोटा मोजण्याच्या अगोदरच संशयितांनी पळ काढला. पैसे भरण्यासाठी दिलेल्या बंडलमध्ये कागद असल्याने फसगत झाल्याचे लक्षात येताच माळी यांनी म्हसरूळ पोलिसांत तक्र ार दाखल केली होती. यापूर्वी पंचवटी परिसरातही बँकेत पैसे भरणा करण्याचा बहाणा करून रोकड चोरल्याची घटना घडली होती. संशयितांना जेरबंद करण्याचे आव्हान निर्माण झाले होते. (वार्ताहर)