सावधान...! भामट्यांकडून तुमच्या पैशांवर मारला जातोय ‘स्मार्ट’ डल्ला
By अझहर शेख | Updated: August 25, 2019 14:21 IST2019-08-25T14:11:54+5:302019-08-25T14:21:22+5:30
अनेकदा कॉल करणारा व्यक्ती तुमच्या बॅँक खात्याची संपुर्ण माहिती तुम्हाला अचूकपणे सांगून विश्वास संपादन करण्याचा पुरेपुर प्रयत्न करतो. जेव्हा असे होते, तेव्हा विश्वास न ठेवता तत्काळ फोन ‘कट’ करून आपल्या बॅँकेशी....

सावधान...! भामट्यांकडून तुमच्या पैशांवर मारला जातोय ‘स्मार्ट’ डल्ला
अझहर शेख
नाशिक : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डिजीटल बॅँकींगचा विकास होत असताना डेबीट-क्रेडिट कार्ड तसेच स्मार्टफोनद्वारे बॅँकींग व्यवहारदेखील वाढत आहे. सायबर सिक्युरिटीशी तडजोड करण्यात निष्णात असलेल्या भामट्यांकडून त्याचा गैरफायदा घेत अनेकांना दररोज विविध शहरांमध्ये लाखो रूपयांना ‘स्मार्ट’ गंडा घातला जात आहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील या डिजीटल बॅँकींगच्या युगात अधिकाधिक जागरूकपणे व्यवहार करण्याची गरज आहे.
राज्यातील विविध शहरांमधील व्यक्तींना लाखो रूपयांना या भामट्यांनी अत्यंत स्मार्टरित्या गंडा घातला आहे. त्यामुळे या सायबर चोरट्यांना आवर घालणे हे आता पोलीस यंत्रणेच्याही हाताबाहेर जात आहे. कारण यंत्रणेला सायबर चोरट्यांचा शोध घेताना विविध मर्यादा येतात. राज्यातील बहुतांश शहरांमधील सायबर पोलीस ठाण्यांमध्ये ‘एक्सपर्ट’चा अभाव प्रकर्षाने जाणवतो. परिणामी अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा छडा अपवादानेच लागतो.
आॅनलाइन गंडा घालण्याचे विविध फंडे सायबर चोरट्यांनी शोधून काढले आहेत. यामुळे नागरिकांची अडचण होऊन सुशिक्षितवर्गदेखील सहज बळी पडत आहे. चोरट्यांकडून अतिशय सुक्ष्मरित्या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या बॅँक खात्यातून रकमेचा सहज अपहार केला जात आहे. चोरट्यांनी विविध बॅँक ग्राहकांच्या क्रेडिट-डेबिट कार्डांची माहिती चोरट्या मार्गाने मिळवून संबंधित ग्राहकांशी फोन, लघुसंदेश, ई-मेलद्वारे संपर्क साधत बनावटरित्या बॅँकेचे अधिकारी असल्याचे भासवून ग्राहकांना त्यांची वैयक्तिक माहिती अचुकपणे सांगत विश्वास संपादन करून घेत ‘ओटीपी’ क्रमांक सेंड करून त्यांच्याकडून तो ‘ओटीपी’ आणि पिन जाणून घेत थेट बॅँक खात्यावरील रक्कम काढून घेतली जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. तसेच चोरट्यांनी यापुढे जाऊन थेट डेबीट-क्रेडिट कार्डांचा ‘डेटा’ मिळवून ‘स्किमर गॅझेट’सारख्या यंत्रांचा वापर करत नागरिकांच्या खात्यामधील रकमेचा अपहार करण्यापर्यंतचे धाडस चोरटे करू लागल्याचे समोर आले आहे.
*आपण जर कुठल्या रेस्टॉरंटमध्ये भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी जात असाल तर आपले डेबिट कार्ड थेट वेटरच्या हाती सोपवू नका.
*पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल्समध्ये डेबीट, क्रेडिट कार्डचा वापर करताना स्वाइप यंत्राकडे लक्ष ठेवा, कारण ते ‘स्किमर गॅझेट’देखील असण्याची शक्यता असू शकते.
* क्रेडिट कार्ड घेण्यासाठी रितसर बॅँकेत जाऊनच अर्ज भरून द्यावा, शॉपिंग मॉल्स व अन्य ठिकाणी भेटणाऱ्या लोकांपासून सावध व्हावे.
* आपल्या खिशातील वॉलेटमध्ये असलेले डेबिट-क्रेडिट कार्डदेखील सुरक्षित राहू शकत नाही. कारण ‘हॅकर्स’ स्मार्ट पध्दतीने विविध मोबाइल अॅप्लिकेशन्स्चा वापर करून ‘रेडियस’ तयार करून तुमच्या खिशातील डेबिट, क्रेडिट कार्ड सहज ‘स्कॅन’ करून माहिती संकलित करू शकतो.
* वॉलेटमध्ये डेबीट-क्रेडिट कार्ड बाळगताना त्याभोवती अॅल्युमिनिअम फॉइल पेपरचे आवरण ठेवावे अन्यथा ‘आरएफआयडी’ अवरोधक वॉलेटचा वापर करावा, जेणेकरून रेडियसमध्ये तुमचे कार्ड स्कॅन होऊ शकणार नाही.
...एटीएम केंद्रात जाताना सावध रहा !
* एटीएम केंद्रात जाण्यापुर्वी आपल्या स्मार्टफोनचा वायफाय किंवा ब्लूटूथ सेटींग्ज आॅन कराव्यात. जेणेकरून केंद्रात काही वायफाय, ब्लूटुथ चोरट्यांकडून सुरू ठेवण्यात आले असतील तर ते तत्काळ निदर्शनास येईल. वायफाय, ब्लूटुथच्या माध्यमातून चोरटे डेबीट कार्डावरील डेटा सहज मिळवू शकतात.
*आपण घाईघाईने सहजरित्या एटीएममध्ये प्रवेश करून आर्थिक व्यवहार पूर्ण करतो; मात्र ते आपल्यासाठी घातक ठरू शकते. चोरट्यांनी एटीएम केंद्रांमध्येही जाळे टाकले असून डोळ्यांना न दिसणारे ‘स्पाय कॅमेरा’ही लावले आहेत. त्यामुळे की-पॅडवर पिनकोड टाकताना दोन्ही हातांचा वापर करावा. एका हात कि-पॅडच्या वरील बाजूने धरावा.
*एटीएम यंत्राचे की-पॅड, तसेच कार्ड इन्सर्ट करावयाची जागा तपासून बघावी. अनेकदा चोरट्यांकडून की-पॅडवर त्याच पध्दतीचे दुसरे बनावट की-पॅडदेखील बसविण्याचा प्रयत्न केला गेलेला असू शकतो.
* रक्कम हातात पडताच यंत्राचा ताबा सोडू नका, व्यवहार संपुर्णत: रद्द करूनच बाहेर पडा.
एटीएम केंद्रात व्यवहार केल्यानंतर जर पावती हवी असेल तर ती प्राप्त करून पुर्णत: फाडूनच कच-याच्या डब्यात फेकावी.
पैशांचे आमीष दाखवून सायबर चोरटे बॅँक एक्सुकिटिव्हकडूनदेखील त्यांच्या उच्चभ्रू ग्राहकांची प्रोफाईल घेण्याची शक्यता अलिकडे वाढत आहे. जे ग्राहक जास्त प्रमाणात डिजीटल व्यवहार करतात अशा ग्राहकांची माहिती चोरट्यांपर्यंत पोहचू शकते.
प्रत्येक लोकप्रिय अॅप हे खरेच असू शकतात असे नाही, तर त्यांचे बनावट वर्जनही गुगलवर अपलोड केले जातात, आणि त्याची लिंक उच्चभ्रू ग्राहकांना ई-मेल, मॅसेजद्वारे पाठविली जाते. जेव्हा तुम्ही त्या लिंकवर भेट देतात तेव्हा तत्काळ तुमची सगळी माहिती त्या हॅकर्सकडे पोहचलेली असते.
लक्षात ठेवा, बनावट अॅप्लिकेशन हे अत्यंत कमी एम.बीमध्ये असतात, त्यामुळे ते स्मार्टफोनची कमी जागा व्यापणार म्हणून डाऊनलोड करण्याचा मोह टाळा.
शॉपिंग डिस्काऊंटच्या विविध आॅफरपासून तर अश्लील व्हिडिओच्या लिंकदेखील आमीषाद्वारे पाठविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे कोणत्याही लिंकवर भेट देताना सावधगिरी बाळगा ‘अलाऊ’वर क्लिक करू नका, जेणेकरून तुमची माहिती मर्ज होणार नाही.
...अशी पाडली जाते भुरळ
महिला ग्राहक असेल तर बनावट कॉल करताना पुरूषाकडून संवाद साधला जातो. तसेच पुरूष ग्राहक असेल तर महिला कॉल करते. हॅकर्सने विरूध्दलिंगी मानसिकतेचाही यावेळी विचार केलेला असतो.
अनेकदा कॉल केल्यानंतर ‘गणिताची जादू’चा चपखल वापर केला जातो. एखादा आकडा सांगून त्यामध्ये तुमचा पीन क्रमांकाची बेरीज किंवा वजाबाकी करावयास सांगितली जाते तेव्हा त्या गणिताच्या जादूद्वारे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या तोंडातूनच आपोआप बाहेर पडलेले असते, आणि हॅकर्सला तेच अपेक्षित असते.
अनेकदा कॉल करणारा व्यक्ती तुमच्या बॅँक खात्याची संपुर्ण माहिती तुम्हाला अचूकपणे सांगून विश्वास संपादन करण्याचा पुरेपुर प्रयत्न करतो. जेव्हा असे होते, तेव्हा विश्वास न ठेवता तत्काळ फोन ‘कट’ करून आपल्या बॅँकेशी संपर्क साधून डेबीट-क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती करावी. तसेच त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती द्यावी.
...‘अलाऊ’वर तुमचे एक ‘क्लिक’ पडेल महागात
स्मार्टफोनचा वापरदेखील तितक ाच स्मार्ट पध्दतीने करणे अत्यावश्यक आहे. गुगल प्ले-स्टोअरवरून कुठलेही अॅप डाऊनलोड करताना सावध रहा. अॅप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ‘अलाऊ’, ‘डिनाय’ असे दोन पर्याय विचारले जातात. त्यावेळी ‘अलाऊ’वर क्लिक करू नका. इंग्रजी सूचना वाचण्याचा कंटाळा करत जेव्हा तुम्ही अलाऊवर (परवानगी देणे) क्लिक करता तेव्हा तुम्ही अज्ञात व्यक्तीला इंटरनेटवरील तुमची माहिती सहजरित्या वापरण्याची परवानगी देत असता, हे लक्षात असू द्या.
- तन्मय दिक्षीत, सायबर सिक्युरिटी अभ्यासक