कार पळविली : इंदिरानगरला व्यावसायिकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:50 IST2020-11-12T15:49:11+5:302020-11-12T15:50:09+5:30
संशयित हल्लेखोरांनी गॅरेजमधील वर्णा कार चोरी करण्याच्या उद्देशाने रामचंद्र यांच्यावर हल्ला केला असावा असा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे.

कार पळविली : इंदिरानगरला व्यावसायिकाचा खून
इंदिरानगर : वडाळा पाथर्डी रस्त्यावरील मेट्रो झोनच्या समोर असलेल्या श्रीजी प्लाझा अपार्टमेंटशेजारी असलेल्या श्री गुरुकृपा गॅरेजचे चालक रामचंद्र रामपराग निसाद (४०, मुळ राह. उत्तरप्रदेश) यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार करत रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ठार मारल्याची घटना गुरुवारी (दि.१२) सकाळी उघडकीस आली.
मारेकऱ्यांनी गॅरेजमधून एक वर्णा कारसुध्दा पळवून नेली आहे.इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील मागील वीस दिवसांत खूनाची ही दुसरी घटना घडली आहे. यापुर्वी पाथर्डीफाटा येथे पतीने पत्नीला गळा आवळून ठार मारल्याचे उघडकीस आले होते. या गुन्ह्याचा तपास पुर्ण होत नाही, तोच पुन्हा खूनाची दुसरी घटना ऐन दीपावलीच्या तोंडावर घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. श्री गुरुकृपा गॅरेज असुन त्या ठिकाणी चारचाकी वाहने दुरुस्ती व वॉशिंग करण्यात येते. गुरुवार (दि.१२) रोजी नेहमीप्रमाणे सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास आकाश पवार गॅरेजमध्ये कामासाठी आला असता चार चाकी वाहने वॉश करण्याच्या रॅम्पवर फुटलेल्या अवस्थेत मोबाइल आढळून आला तेथून काही अंतरावरगॅरेज चालक रामचन्द्र यांचे डोक्यावर गंभीर जखमा झालेल्या व मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याने तातडीने गॅरेजचे भागीदार तंबी व शेजारील दुकानदारांना आणि इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करुन मृतदेहाचा कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्यास सांगून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला. याप्रकरणी त्यांचे व्यावसायिक भागीदार मुरुवान तंबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारचोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचा संशय
संशयित हल्लेखोरांनी गॅरेजमधील वर्णा कार चोरी करण्याच्या उद्देशाने रामचंद्र यांच्यावर हल्ला केला असावा असा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. संशयितांच्या शोधासाठी शहरातील रस्त्यावरील आणि शहराबाहेर जाणाऱ्या टोलनाक्यावरील सीसी टीव्हीचे फुटेज तपासण्यात येत सल्याचे पोलिसांनी सांगितले.