नाशिक : कर्करोगावरील १०६ औषधांवरील ‘व्हॅट’ शासनाने हटवला असला, तरी नाशकातील रुग्णांना महिनाभराने ही औषधे स्वस्तात उपलब्ध होऊ शकणार आहेत. शहरातील केमिस्ट व्यावसायिकांकडे साधारणत: महिनाभराचा साठा शिल्लक असून, त्यानंतर येणाऱ्या नव्या साठ्यातील औषधे घटलेल्या दराने मिळू शकतील. शासनाच्या या निर्णयामुळे ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार असले, तरी या किमती आणखी घटवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार असून, त्यांच्यावरील उपचारपद्धती महागडी आहे. कर्करोगाची शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाला साधारणत: पुढील तीन ते साडेतीन महिने केमोथेरपी घ्यावी लागते. त्यात विविध गोळ्या व इंजेक्शन्सचा समावेश असतो. याशिवाय पुढील पाच वर्षे नियमित गोळ्या घ्याव्या लागतात. ही सगळी औषधे प्रचंड महागडी आहेत. शासनाच्या निर्णयामुळे त्यांच्या किमतीत आता पाच टक्क्यांनी घट होणार आहे. त्यामुळे केमोथेरपीचा खर्चही घटणार असून, दहा हजार रुपयांवर पाचशे रुपये कमी होणार असल्याने रुग्णांना दिलासा लाभणार आहे. शासनाने व्हॅट हटविण्याचा निर्णय काल घेतला असला, तरी केमिस्ट व्यावसायिकांकडे पुढील महिनाभराची औषधे शिल्लक आहेत. हा साठा संपल्यानंतर येणारी नवी औषधे विनाव्हॅट उपलब्ध होऊ शकणार आहेत. त्यामुळे तूर्त तरी ग्राहकांना दिलाशासाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कॅन्सरची औषधे महिनाभरात स्वस्त
By admin | Updated: August 22, 2015 23:47 IST