कॅलिग्राफीतून चढवलेला सौंदर्याचा साज..
By Admin | Updated: February 25, 2015 01:23 IST2015-02-25T01:16:25+5:302015-02-25T01:23:01+5:30
कॅलिग्राफीतून चढवलेला सौंदर्याचा साज..

कॅलिग्राफीतून चढवलेला सौंदर्याचा साज..
नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कविता म्हणजे ‘कुसुमाक्षरे’ आणि त्यांना कॅलिग्राफीतून चढवलेला सौंदर्याचा साज... या मिलाफामुळे तात्यासाहेबांच्या कविता जणू दागिने लेवून अवतरल्याचाच आभास रसिकांना झाला... निमित्त होते चित्रकार नंदू गवांदे यांच्या ‘कुसुमाक्षरे’ या आगळ्या कॅलिग्राफिकल पेंटिंग प्रदर्शनाचे... गंगापूर रोड येथील हार्मनी आर्ट गॅलरीत या प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपाचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, अॅड. विलास लोणारी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. फरांदे म्हणाले की, शब्दसौंदर्याने नटलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितांना गवांदे यांचा अक्षरसाज लाभल्यामुळे सुंदर कलाकृतींची निर्मिती झाली आहे. रंगसंगती, लय, शैली ही या अक्षरांची खासियत आहे. अॅड. लोणारी यांनीही प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. आगामी जागतिक मराठी भाषादिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनात कुसुमाग्रजांच्या २७ निवडक कवितांच्या ओळी खास कॅलिग्राफीत साकारण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)